लातूर: शहरातील भुगर्भातील पाण्याची पातळी खूप खोल गेली असल्याने जलपुर्नभरण करणे लातूर शहरासाठी अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे शहरातील सर्व नागरिकांनी त्यांच्या छतावर व खुल्या जागेवर पावसाळ्यात जमा होणारे पाणी जलपुर्नभरणाद्वारे स्वतःच्या बोअरवेल मध्ये मुरविणे आवश्यक आहे. बोअरवेल नसल्यास प्लॉट मध्ये खड्डा करुन जमीनीमध्ये मुरविणे आवश्यक आहे किंवा जमीनीखाली पाण्याची टाकी बांधून इतर वापरासाठी पाण्याची साठवणूक करावी. नागरीकांना जलपुर्नभरणा बाबत तांत्रिक सल्ला हवा असल्यास महानगरपालिके मार्फत तांत्रिक सल्ला दिला जाईल असे आवाहन मनपाने केले आहे. ज्या मालमत्ताधारकांनी आपल्या ईमारतीवरील पावसाच्या पाण्याचे जलपुर्नभरण केले आहे अशा मालमत्ताधारकांना लातूर शहर महानगरपालिकेतर्फे मालमत्ता करावर पाच वर्ष 5% कर सवलत देण्यात येणार आहे. जलपुर्नभरण केलेल्या नागरीकांनी ही सवलत मिळण्यासाठी महानगरपालिकेत अर्ज करावा, महानगरपालिकेचे अधिकारी प्रत्यक्ष पहाणी करुन अहवाल दिल्यानंतर पुढील वर्षापासून नागरीकांना त्याचा लाभ घेता येईल. लातूर शहराच्या पाणी पुरवठ्याचा मुख्य स्रोत असलेल्या मांजरा धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे नागरिकांनी महानगरपालिके तर्फे पुरविण्यात येणारे पाणी काटकसरीने वापरावे. आपल्या गरजे इतके पाणी भरुन झाल्यानंतर नळाची तोटी बंद करावी. कोणत्याही परिस्थितीत पाण्याचा अपव्यय करु नये. टंचाईग्रस्त लातूर शहर हा कलंक पुसण्यासाठी सर्वांनी मिळून जलपुनर्भरण व पाण्याची बचत करुन एकत्रितपणे प्रयत्न करु असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.
Comments