लातूर: विविध प्रकारच्या विशेष आजारांवर उपचार करण्यासाठी मराठवाडा आणि लातूर परिसरातील रुग्णांना यापूर्वी पुणे किंवा मुंबई येथे जावे लागत असे. प्रगत तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक यंत्रांच्या सहाय्याने निदान व उपचार मिळावे यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागत असत. उपचारांपेक्षा प्रवास व अन्य व्यवस्थांचा खर्च अधिक होत असल्याने रुग्णांच्या अडचणीत भर पडत असे. पण आता विवेकानंद रुग्णालयात अत्याधुनिक पद्धतीने उपचाराच्या अनेक सुविधा उपलब्ध झाल्या असून यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे. जागतिक पातळीवरील आधुनिक पद्धतीचे उपचार येथे उपलब्ध असून एमआरआय साठी ३ टेस्ला ही आधुनिक मशिनही आता कार्यान्वित झाली आहे.
एमआरआय तपासणीच्या माध्यमातून विविध आजारांचे अचूक निदान करता येते म्हणून विवेकानंद रुग्णालयाने जागतिक पातळीवरील सर्वात प्रगत आणि आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असणारे ३ टेस्ला हे मशीन उपलब्ध केले आहे. या मशिनच्या सहाय्याने घेण्यात येणाऱ्या प्रतिमा अधिक सुस्पष्ट असतात. त्यामुळे या मशिनच्या माध्यमातून मेंदू, मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या, मानेच्या नलिका, मेंदूमधील ट्युमर, मेंदूला रक्तपुरवठा होण्याचे प्रमाण, मेंदूमधील गाठी तसेच यामुळे बोलणे व ऐकण्यावर होणारे दुष्परिणाम याचे अचूक निदान करणे सहज शक्य आहे, अर्धांगवायू झालेल्या रुग्णांचे त्वरित निदान करणे या मशिनमुळे शक्य होणार आहे. फेफरे येणे, चक्कर येणे, कानाच्या आतील भागास झालेली इजा तपासणे, अपघातात शिरांना झालेली इजा पाहून त्यावर उपचार करणे आता लातुरात शक्य होणार आहे .
किडनीच्या आजारात रक्त नलिकेची तपासणी करण्यासाठी इंजेक्शन द्यावे लागत असे. पण आता या मशिनमुळे इंजेक्शन न देता तपासणी शक्य आहे. शरीरातील सांध्यांचे आवरण खराब झाले असेल तर त्याचीही तपासणी सोपी झाली आहे. लिव्हरमध्ये साठलेली चरबी आणि आयर्न ओळखणे तसेच शरीरात पसरलेल्या कर्करोगाच्या गाठी, पाठ, कंबर व मान, सर्व मणके, पित्ताशयात अडकलेले खडे, पौरुष ग्रंथी या सर्व अवयवामधींल सुप्त असणाऱ्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी हे मशिन अत्यंत उपयुक्त आहे. जबडा, खांदा, गुडघे, पाऊल , घोटा, हात या अवयवांचे सर्व सांधे तसेच मेंदू, स्तन पोट आणि ओटीपोटातील प्रत्येक अवयवाच्या तपासणीसाठी स्वतंत्र कॉईल्स उपलब्ध केल्या आहेत .भगंदर ,नासुर यासारख्या आजारांचे निदान आता सुलभ होणार आहे. हृदयाचा कुठला भाग कमजोर झाला आहे याचीही तपासणी शक्य होणार आहे. विवेकानंद रुग्णालयाच्या रेडिओलॉजी व इमेजिंग विभागात इतरही अनेक अत्याधुनिक यंत्रसामुग्रीची भर पडलेली आहे. त्यामध्ये ३२ स्लाईस सीटी स्कॅन तसेच स्तनांचे आजार तपासण्यासाठी डिजिटल मॅमोग्राफी, सोनोग्राफी, डिजिटल रेडिओग्राफी या सुविधाही रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध झाल्या आहेत. गरजू रुग्णांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा तथा रेडिओलॉजी विभाग प्रमुख सौ अरुणा देवधर यांनी केले आहे.
Comments