लातूर: मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उन्हाचा चटका वाढत आहे. त्यासोबतच पाणीटंचाईचे चटकेही सहन करावे लागत आहेत. निलंगा तालुक्यातील अंबुलगा मेन या गावात पिण्यासाठी तीन ते चार किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. प्रशासनाने पाणीटंचाई दूर करण्यासाठी वेळीच पावले उचलावीत अशी मागणी राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष धनंजय भुरके भुरके यांनी केली आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने प्रकल्पामध्ये पुरेसा पाणीसाठा झाला नाही. यामुळे अनेक गावांमध्ये पाणीटंचाई आहे. परंतु अंबुलगा मेन या गावातील परिस्थिती वेगळी आहे. या गावाला मसलगा प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. प्रकल्पात त्यासाठी विहीर घेण्यात आली असून विंधन विहीरही आहे. प्रकल्पापासून गावापर्यंत जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे. प्रकल्पातील पाणी गावातील पाण्याच्या टाकीत सोडून ते गावात पुरवले जाते. परंतु जलवाहिनी नादुरुस्त असल्याने प्रकल्पातून पाणीपुरवठा बंद आहे. दुरुस्तीसाठी अनुदान मंजूर झालेले आहे परंतु संबंधितांच्या दुर्लक्षामुळे दुरुस्तीचे काम केले जात नाही. याचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. अंबुलगा मेन या गावात असणाऱ्या एकमेव विंधन विहिरीतून गावकऱ्यांना पाणी मिळत आहे. परंतु या विंधन विहिरीला पुरेसे पाणी नाही. त्यामुळे तहान भागविण्यासाठी नागरिकांना तीन ते चार किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. इतर कामे सोडून दिवसभर पाणी आणण्याचे काम करावे लागत आहे. भुरके यांनी यासंदर्भात गावच्या सरपंचांची भेट घेऊन तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे.
पोकळ घोषणाबाजी ...
दोन दिवसांपूर्वीच या भागाचे आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी त्या-त्या भागातील पाणीटंचाईची जबाबदारी संबंधित लोकप्रतिनिधीची असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानुसार अंबुलगा मेन या गावातील पाणीटंचाईची जबाबदारी त्यांनी घेणे आवश्यक आहे. पालकमंत्र्यांनी ही जबाबदारी स्विकारावी आणि गावकऱ्यांना तातडीने पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही बोडके यांनी केली आहे.
Comments