लातूर: तत्कालीन समाजव्यवस्थेत आश्रम व्यवस्थेवर आघात केले जात होते. यामुळे आपल्या आईच्या आज्ञेवरून भगवान परशुराम यांनी क्षत्रिय कुलांचा नि:पात केला. सद्रक्षणाय- खलनिग्रहणाय या भूमिकेतून त्यांनी हे कार्य केले आणि हीच त्यांची भूमिका होती, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी केले. भगवान परशुराम जयंती उत्सव समितीच्यावतीने 'परशुरामांचे अलौकिक कार्य' या विषयावर अरुण करमरकर यांचे व्याख्यान झाले. विवेकानंद संस्कार संस्थेच्या सभागृहात पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम संपन्न झाला. समितीचे अध्यक्ष संजय निलेगावकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. भगवान परशुरामांच्या कार्याची विस्तृत माहिती देताना करमरकर यांनी परशुरामांनी घालून दिलेले आदर्श, त्यांची समर्पण वृत्ती, आज्ञापालन या बाबींचा विशेष उहापोह केला. परशुरामांच्या नवनिर्मितीचीही त्यांनी माहिती दिली. महापुरुषांच्या चरित्राचा अभ्यास करताना तो काळ, त्या काळातील समाजजीवन आणि प्रचलित असणारी मूल्यव्यवस्था जतन करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा विचार केला पाहिजे. महापुरुषांनी मांडलेले विचार आजच्या मूल्य चौकटीत मांडणे योग्य ठरणारे नाही. त्यांनी मांडलेल्या मूल्यांचा शाश्वत आणि तात्कालिक विचार केला पाहिजे, असे ते म्हणाले. परशुराम यांनी शस्त्र आणि अस्त्र विद्या प्राप्त करण्यासाठी प्रचंड मोठी साधना व तपश्चर्या केली होती. या माध्यमातून शिक्षणासाठी तपश्चर्या करण्याचा आदर्श त्यांनी घालून दिला. पृथ्वी नि:क्षत्रिय केल्यानंतर संपूर्ण भूमीवर त्यांचाच अधिकार होता. परंतु स्वतः जिंकलेली भूमी कश्यप ऋषींना दान करून समर्पण वृत्तीचा आदर्शही त्यांनी घालून दिला. आजच्या राजकीय व सामाजिक स्थितीत अत्यंत दुर्मिळ असणारा हा पैलू असल्याचे करमरकर म्हणाले. यामुळेच भगवान परशुराम यांचे कार्य अलौकिक होते. नवनिर्मिती हे भगवान परशुरामांचे आणखी एक कार्य आहे.नर्मदेपासून कन्याकुमारी पर्यंतचा प्रदेश त्यांनी वसवला. समुद्र मागे सारून तेथील भूमिपुत्रांना सोबतीला घेत हा प्रदेश नव्याने विकसित केला. वसाहतींची स्थापना केली. हा निर्मितीचा संस्कारही परशुरामांनी घालून दिला. यामुळेच ते महापुरुष ठरतात असेही करमरकर म्हणाले .
संजय निलेगावकर यांनी प्रास्ताविक केले. अशोक कुकडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले .पद्मभूषण मिळाल्याबद्दल ॲड. संजय पांडे यांनी सन्मानपत्र देऊन डॉ. कुकडे यांचा सत्कार केला. अजय पांडे यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. जयंत चौधरी यांचा करमरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय अयाचित तर आभार प्रदर्शन पत्रकार प्रदीप नणंदकर यांनी केले.
Comments