लातूर: लातूर शहरात कर्करोगाच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना उपचारादरम्यान लागणारी निवास व भोजन व्यवस्था अत्यल्प दरात उपलब्ध करून देणाऱ्या रुग्णसेवा सदनचा भूमिपूजन सोहळा मंगळवारी ०७ मे २०१९ रोजी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुरेश हावरे यांच्या हस्ते होणार आहे. हा भूमिपूजन सोहळा मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता विवेकानंद कँसर हॉस्पिटल, एमआयडीसी, लातूर या ठिकाणी होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे हे राहणार आहेत. या कार्यक्रमास पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, आ. अमित देशमुख, टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. कैलाश शर्मा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कर्करोग झालेल्या रुग्णाला उपचार चालू असतांना रेडिएशन व केमोथेरपीचा उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल न होता काही तासांकरिता हॉस्पिटलमध्ये यावे लागते व उपचार घेऊन परत घरी जावे लागते. हे उपचार सतत कांही दिवस किंवा महिना घ्यावा लागतो. अशावेळी उपचारासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील रुग्णांची मोठी गैरसोय होते किंवा त्यासाठी निवासाची अन्य सोय पाहावी लागते. त्यामुळे अशा गरजू रुग्णांना अत्यल्प शुल्कात उत्तम प्रकारची निवास व भोजन व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जलयुक्त लातूर टीमच्या वतीने लोकसहभागातून सदर रुग्ण सेवा सदन उभारले जात आहे. लातुरात विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या विवेकानंद कँसर हॉस्पिटलशी सदर सदन संलग्न असणार आहे. विवेकानंद कँसर हॉस्पिटलच्या शेजारी निर्माण होणाऱ्या या रुग्णसेवा सदनमध्ये १५० रुग्णांची सोय केली जाणार आहे. यामध्ये रुग्णांकडून नाममात्र शुल्क आकारले जाणार असून त्या शुल्कातूनच सदनचा देखभाल-दुरुस्ती खर्च केला जाणार आहे. यामध्ये वातानुकूलित खोल्यांचीही सोय करून दिली जाणार आहे. हा उपक्रम पूर्णतः लोकसहभागातून उभारला जाणार असल्याने या सदनच्या निर्मितीत योगदान देऊ इच्छिणाऱ्यांकडून त्यांच्या इच्छेप्रमाणे देणगीही स्वीकारली जाणार आहे. मंगळवारी होणाऱ्या या भूमिपूजन सोहळ्यास सर्वानी अगत्याने उपस्थित राहावे असे आवाहन रुग्णसेवा सदनचे अध्यक्ष बीबी ठोंबरे, विवेकानंद मेडिकल फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौ. अरुणा देवधर, रुग्णसेवा सदनचे सदस्य मनोहरराव गोमारे, निलेश ठक्कर, डॉ. विश्वास कुलकर्णी, मकरंद जाधव, कुमुदिनी भार्गव, प्रभावती गोरे, अतुल ठोंबरे, शिवदास मिटकरी यांनी केले आहे.
Comments