लातूर: वसुंधरा प्रतिष्ठानच्या पुढाकाराने लातुरातील पापविनाश रोड भागातील यशवंत विद्यालयात गतवर्षी महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त विविध प्रकारच्या २५ झाडांची लागवड करण्यात आली होती. शाळेने अतिशय मेहनतीने झाडांचे संवर्धन केले असून, मंगळवारी या २५ झाडांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. झाडांना फुगे लावून सजविण्यात आले. शिवाय केक कापून या झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो. मात्र, लातुरात गेल्या २-३ वर्षांपासून झाडांचे वाढदिवस साजरे करण्याची परंपरा वसुंधरा प्रतिष्ठानने सुरु केली आहे. लातूर शहर आणि जिल्ह्यात वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे. काळाची ही गरज ओळखून वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने मागच्या चार वर्षांपासून वृक्ष लागवड, संवर्धन आणि जनजागृती व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे. वसुंधरा प्रतिष्ठानने चळवळ उभी केल्याने वृक्ष संवर्धनची जागरूकता निर्माण झाली असून, यात अनेकजण योगदान देत आहेत. वसुंधरा प्रतिष्ठानच्या पुढाकाराने हजारो झाडांची लागवड आणि संवर्धन झाले आहे. गतवर्षी महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त यशवंत विद्यालयात लावण्यात आलेल्या झाडांची वाढदिवस मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा वृक्ष संवर्धन केल्याबद्दल शाळा प्रशासन आणि कर्मचारी यांचा सत्कार केला. शिवाय, या शाळेचा आदर्श इतरही शाळांनी घेऊन वृक्ष संवर्धनासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. यावेळी मुख्याध्यापक एमआर पाटील, स्वामी सर, बनसोडे सर, बिराजदार सर, हुडे सर, संगमेश्वर कोरे, बालाजी सोनवणे, वसुंधरा प्रतिष्ठानचे प्रा. योगेश शर्मा, उमाकांत मुंडलिक, अमोल स्वामी, अभिजित स्वामी, हुसेन शेख आदींची उपस्थिती होती.
पाणी वाचवा, वृक्ष जगवा मोहीम
वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने पाणी वाचवा आणि वृक्ष जगवा मोहीम हाती घेण्यात आली असून, यासाठी व्यापक पद्धतीने जनजागृती केली जात आहे. सध्या पाण्याची भीषण टंचाई असून, पाणी निर्माण करणे शक्य नसले तरी पाणी वाचविणे काळाची गरज आहे. येत्या पावसाळ्यात वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली जाणार असून, यासाठी आतापासूनच तयारी सुरु करण्यात आली आहे. शिवाय, सध्या आहे त्या उपलब्ध पाण्यातून झाडे जगवावीत असे आवाहनही वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे.
Comments