लातूर: लातूर शहराच्या विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या मित्र परिवारांनी एकत्रित येऊन सेवाभावनेने कर्करोग पिडीत रुग्णांसाठी मोफत भोजन उपलब्ध करून देण्याचा जो अभिनव उपक्रम हाती घेतला आहे तो अत्यंत स्तुत्य व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे यांनी केले. लातूर येथील विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानद्वारा संचलित विवेकानंद कँसर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तथा सामाजिक बांधिलकी आस्थेने जोपासणाऱ्या तरुण मित्र मंडळींनी एकत्रित येऊन अक्षय भोज उपक्रम मागच्या आठ-दहा दिवसांपासून सुरु केला आहे. कर्करुग्णांना उपचारासाठी आल्यानंतर सकस, पोषक आहाराची असणारी गरज ओळखून हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाचे लोकार्पण गुरुवारी दुपारी विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानचे संस्थापक पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ मनोहरराव गोमारे, विवेकानंद कँसर हॉस्पिटलच्या अधिक्षिका डॉ. मीरा नागांवकर, डॉ. शिरपूरकर, रुग्णसेवा सदनचे सदस्य मकरंद जाधव, शिवदास मिटकरी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना डॉ. कुकडे यांनी तरुणांकडून स्वयंस्फूर्तीने राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले. या रुग्णालयात कर्करोग पिडीतांवर चांगल्यात चांगले उपचार केले जातात. पिडीतांना उपचारासाठी आल्यानंतर उत्तम प्रकारच्या भोजनाची गरज भासते. पण, हॉस्पिटल परिसरात चांगले हॉटेल नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असे. रुग्णांची ही गरज ओळखून तरुण मित्रांनी एकत्रित येऊन हा अक्षय भोज उपक्रम सुरु केला आहे. हा उपक्रम अगोदर सुरु करून मग त्याचे लोकार्पण केले, म्हणजे आधी केले मग सांगितले, ही उक्ती या ठिकाणी चपखल लागू पडते. या उपक्रमास अक्षय भोज असे नांव देण्यात आले. आहे. अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारे. त्यामुळे हा उपक्रम असाच अखंडितपणे चालू राहील, असा विश्वासही डॉ. कुकडे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी अक्षय भोज मित्र परिवाराच्या वतीने डॉ. कुकडे, डॉ. नागांवकर, अॅड. गोमारे, जाधव, शिवदास मिटकरी यांचा सन्मान करण्यात आला. हा उपक्रम राबविणारे सामाजिक कार्यकर्ते दत्ता माळी यांचाही डॉ. कुकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन शिरीष कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन योगेश पथक यांनी केले. यावेळी नगरसेविका वर्षा कुलकर्णी, शितल रांदड, रवी अग्रवाल, योगेश पाठक, पवन रांदड, अतुल औसेकर, राजेश मित्तल, आशिष मित्तल यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Comments