लातूर: भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी पाणी फाऊंडेशनच्या वतीने औसा मतदारसंघातील डोंगरगाव येथे श्रमदानातून जलसंधारणाची कामे सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी डोंगरगाव येथे भेट देवून या श्रमदानात सहभाग घेतला. पाण्याचे महत्व आता सर्वानाच कळले आहे. यामुळे गावोगाव जलसंधारणाची कामे सुरू आहेत. गावकऱ्यांचा सहकार्यातून, लोकसहभागातून सुरू असणाऱ्या या कामांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. डोंगरगाव येथे पाणी फाऊंडेशनच्या पुढाकारातून सुरु झालेल्या कामात अभिमन्यू पवार यांनी श्रमदानात प्रत्यक्ष सहभाग घेतला. डोंगरगाव येथील अबालवृद्ध श्रमदान करीत आहेत. गावकऱ्यांचे हे काम पाहून अभिमन्यू पवार प्रभावित झाले. त्यांनी स्वतः श्रमदानात सहभाग घेतला. गावकऱ्यांचा साथीने खोदकाम केले. खोदलेली माती भरून इतरत्र टाकण्यास मदत केली. पवार यांना आपल्यात सहभागी झाल्याचे पाहून गावकऱ्यांचा उत्साह दुणावला. श्रमदान झाल्यानंतर पवार यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला श्रमदान करणाऱ्या लहान मुलांशी गप्पा मारल्या. याप्रसंगी पाणी फाउंडेशनचे दत्ता साखरे, बालाजी हजारे, शिवाजी बिराजदार, माधव मोहिते, नंदाबाई बिराजदार, चमकाबाई बिराजदार, राजाबाई बिराजदार, गावचे सरपंच अशोक हजारे, उपसरपंच मोहन बिराजदार, चेअरमन रवींद्र मोरे, युवराज बिराजदार, संताजी चालुक्य, व्यंकट माने, परमेश्वर बिराजदार, जिलानी बागवान, जगन्नाथ मुळे, लातूर मनपाचे नगरसेवक चंद्रकांत बिराजदार, नितीन वाघमारे, अजय कोकाटे यांच्यासह गावकऱ्यांनीही श्रमदान केले.
Comments