लातूर: लातूर शहर महानगरपालिका आयुक्त एमडी सिंह व शहर वाहतूक पोलीस प्रशासन यांच्या वतीने शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या नियोजनाकरिता शहरातील सर्व मुख्य चोक व मुख्य रस्त्यांची पाहणी करण्यात आली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे सहभागी झाले होते.
शहरातील वाहतूक व्यवस्थेला मनपाही जबाबदार आहे यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजी चौकपासून पाहणी करण्यास सुरुवात करण्यात आली, यामध्ये एसटी डेपोमुळे येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यात आल्या, बसेसमुळे औसा रोडकडे जाणारी वाहने व तिथून येणारी वाहने यांची अडचण तात्काळ दूर करण्याकरिता चर्चा करण्यात आली. जुना रेणापूर नाका येथे होणारी वाहतूक कोंडीही तेथील काही भाग मोकळा करून वाहतूक सुरळीत करण्याचे ठरविण्यात आले, पुढे गंज गोलाई येथील सर्व छोट्या विक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपात बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. या पाहणीमध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये गंजगोलाई परिसरात विक्री करणारे भाजीवाले, फळवाले, मसालेवाले, झाडू व हळदी कुंकू विकणारे, पेपरवाले, चप्पल बूट व इतर छोटे मोठे व्यवसाय करणारे सर्व पथविक्रेत्यांना लकी ड्रॉ द्वारे नंबर टाकून त्यांना जागा देण्याचे ठरवावे असे आदेश आयुक्तांनी दिले. या ठिकाणी बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने तेथील पार्किंग आण्णाभाऊ साठे चौक येथे तात्पुरत्या स्वरूपात हलविण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी रमजान ईदच्या मुहूर्तावर गंजगोलाई परिसरात जे काही छोटे-मोठे व्यापारी आपला स्टॉल लावत असतात त्यांनी महानगरपालिकेची पूर्व परवानगी घेऊनच आपला त्याठिकाणी लावावा अशी सूचना आयुक्तांनी केली. पोलीस प्रशासनाच्या वतीने दर वर्षी दोन दिवस दुकाने लावण्यास परवानगी देण्यात येते त्या सर्व दुकानांना यावर्षी गोलाई च्या पुढील मोकळ्या जागेत किंवा टाऊन हाल येथे बसण्याची परवनगी व नियोजन करून देण्यात यावे असे सुचविण्यात आले. त्यावर चर्चा करून निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले. यावेळी शहर अभियंता दिलीप चिद्रे, शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलानी, पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, अतिक्रमण विभाग प्रमुख शेख, सलाऊद्दीन काझी उपस्थित होते.
Comments