लातूर: जिल्हयातील सर्व संबंधित शासकीय विभागांनी संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपल्या अधिनस्त सर्व यंत्रणा सज्ज ठेवाव्यात. तसेच प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापनाचे गावनिहाय सूक्ष्म आराखडे तयार करुन त्याची आपत्ती काळात प्रभावी अंमलबजावणी करण्याची सतर्कता ठेवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष जी. श्रीकांत यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मान्सून पूर्व तयारीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्रीकांत बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी, पोलिस उप अधिक्षक मधुकर जवळकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी व यंत्रणा प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले, संभाव्य आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने प्रत्येक विभागाला दिलेली जबाबदारी परस्परांत योग्य समन्वय ठेवून पार पाडली पाहिजे. प्रत्येक विभागाने गावनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार केल्यास त्या गावात कोणत्याही प्रकारची आपत्ती उद्भवल्यास त्या आराखडयानुसार संबंधित गावातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम केल्यास त्या आपत्तीमध्ये नगण्य नुकसान होईल. त्यासाठी प्रत्येक विभागाने सर्तक राहून काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांनी यांनी लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह नदी काठावरील परिसरातील गावांची पाहणी करुन नदीच्या पूर पातळीजवळील वस्त्यांचे स्थलांतर करावे. लघुपाटबंधारे विभागाने पाणीसाठा, क्षमता याची वेळोवेळी माहिती घेण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करुन नोडल अधिकारी नेमावेत. तसेच पूर पातळीची Blue Line आणि Red Line निश्चित करण्यासासाठी नोडल अधिकार्यांची नियुक्तीह करुन अहवाल सादर करावा. असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले. जिल्ह्यातील मोठे धरण, पाझर आणि साठवण तलावाची पाहणी करुन देखभाल दुरुस्ती तात्काळ करुन त्याठिकाणी संपर्क अधिकाऱ्याची नियूक्ती करावी. ज्या गावांचा पुरामुळे संपर्क तुटण्याची शक्यता आहे अशा गावांचा सर्व्हे करुन पुरवठा विभागाने अन्न, औषध आणि पेट्रोल साठा वेळेवर उपलब्ध करण्याचे नियोजन करावे. सार्वजनीक बांधकाम विभागाने रस्त्यांची पाहणी करुन पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्तीची कामे करावीत. आपत्का लीन परिस्थितीत झाडे मोडून रस्त्यावर पडणे, पूरामुळे रस्ते फुटणे, रस्ते अपघात इत्यादी वाहतूक व्यवस्थेत निर्माण झालेला अडथळा दूर करुन वाहतूक सुरळीत सुरु राहण्यासाठी जेसीबी, पोकलेन, डंपर आदी साहित्य तात्काळ उपलब्ध होईल, याची दक्षता घ्यावी. आरोग्य विभागाने संसर्गजन्य आणि साथीच्या रोग नियंत्रणासाठी तयारी करुन गावातील आरोग्य केंद्रात आवश्यक औषधीसाठा उपलब्ध करुन द्यावा, आरोग्य विभागात नियंत्रण कक्ष स्थापन करावे. सर्प दंश आणि विंचू दंशावर प्रभावी औषधी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करुन देण्यात याव्यात. मागील तीन वर्षात कोणत्या गावामध्ये कोणत्या प्रकारच्या रोगांचा प्रार्दूभाव झाला होता, त्यानुसार त्या-त्या गावामध्ये आरोग्य सुविधा पुरविण्याचे नियोजन करावे. आपत्तकालीन परिस्थितीत रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध करण्याचे नियोजन देखील आरोग्य विभागाने करावे. पशुसंवर्धन विभागाने जनावरांकरीता रोगप्रतिकारक लसी उपलब्ध करुन ठेवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिल्या.
Comments