HOME   लातूर न्यूज

जलद रेल्वेगाड्याना पानगावात थांबा द्या

रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य निजाम शेख यांना निवेदन


जलद रेल्वेगाड्याना पानगावात थांबा द्या

लातूर: रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींच्या दर्शनासाठी देशाच्या विविध भागातून नागरिक येतात. पण येथील रेल्वे स्थानकावर जलद रेल्वेगाड्याना थांबा नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पानगाव येथे सर्व जलद रेल्वेगाड्याना थांबा मिळवून द्यावा, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारक ट्रस्टच्या वतीने सेंट्रल रेल्वेच्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक झोनल रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य निजाम शेख यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
पानगाव हे तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून या गावाची लोकसंख्या जवळपास २५ हजार एवढी आहे. परिसरातील २० गावांचा येथे दैनंदिन संपर्क असतो. पानगाव येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थींचे जतन करण्यात आले आहे. शासनाने या ठिकाणाला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलेला आहे. ०६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या अस्थींचे दर्शन घेण्यासाठी लाखो अनुयायी येथे येतात. १० कोटी रुपये खर्च करून येथे भव्य स्मारक उभारले जात आहे. पानगाव येथे रेल्वे स्थानक आहे. या मार्गावरून अनेक गाड्या धावतात. पण जलद गाडयांना येथे थांबा नाही. त्यामुळे पानगाव येथे येणाऱ्या नागरिकांना इतर रेल्वे स्थानकांवर उतरून येथे यावे लागते. यासाठी येथून जाणाऱ्या कोल्हापूर-नागपूर व पुणे-अमरावती या जलद रेल्वेगाड्याना पानगाव येथे थांबा द्यावा, अशी मागणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारक ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व्हीके आचार्य यांनी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देताना जिल्हा परिषद सदस्य सुरेश लहाने, माजी सभापती चंद्रचूड चव्हाण, सरपंच सुकेश भंडारे, ग्रामपंचायत सदस्य शिला आचार्य, आनंद आचार्य, किशोर चक्रे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. या मागणीसंदर्भात रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा करून पानगाव येथे जलद रेल्वेगाड्यांना थांबा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन निजाम शेख यांनी दिली.


Comments

Top