HOME   लातूर न्यूज

लातूरचे सुपूत्र व्यंकट मरे गुवाहटी वायुतळाचे कमांडर

सहा हजार तासांपेक्षा अधिक काळ हेलिकॉप्टर चालवण्याचा अनुभव


लातूरचे सुपूत्र व्यंकट मरे गुवाहटी वायुतळाचे कमांडर

लातूर: लातूरच्या निलंगा तालुक्यातील चिलवंतवाडी येथील शेतकरी कुटूंबाचा वारसा असणारे व्यंकट तुकाराम मरे यांनी देशाच्या वायुदलात सेवा सुरु केली होती. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनीत शिक्षण पूर्ण केलेल्या आणि सहा हजार तासांपेक्षा अधिक काळापर्यंत हेलीकॉप्टर पायलट म्हणून उड्डाणांचा अनुभव असलेल्या एअर कमांडर व्यंकट मरे यांनी नुकताच आसामची राजधानी गुवाहटी येथील बोरझर एअर स्टेशनचे माजी एअर कमोडोर शशांक मिश्रा यांच्याकडून पदभार स्विकारला आहे.
लातूरचा शिक्षण क्षेत्राशिवाय येथील भूमिपूत्रांमुळे अनेक क्षेत्रात नाव लौकिक झालेला आपण अनुभवतो आहोत. केवळ दुष्काळी पार्श्‍वभूमी असलेल्या आणि शेतकर्‍यांसाठी दूर्लक्षीत लातूर जिल्हा जरी समजला जात असला तरी लातूरच्या स्व. विलासराव देशमुखांपासून आज राष्ट्रीय संरक्षण क्षेत्रात सुध्दा आपली कसब दाखवणार्‍या व्यंकट मरे सारख्या भूमिपुत्रांमुळे लातूरचा गौरव अटकेपार जातोय यात शंकाच नाही. विविध क्षेत्रात आपल्या कार्यकुशलतेच्या आणि विद्वत्तेच्या जोरावर हा अनुभव आपण घेत आहोत.
१६ जून १९९० साली वायुदलाच्या सेवेत रुजू झालेले व्यंकट तुकाराम मरे हे निलंगा तालुक्यातील चिलवंतवाडी सारख्या अगदी लहानशा खेड्यातील शेतकरी कुटूंबातील आहेत. वायुदलातील उड्डाण विभागात सेवा सुरु केल्यानंतर हेलीकॉप्टर पायलट म्हणून कार्यरत होते. हे करत असताना त्यांनी जम्मू-कश्मीर, पूर्वांचलच्या (सात राज्यांसह) विविध मोहिमांवर त्यांनी अतिशय प्रभावीपणे आपली भूमिका पार पाडलेली आहे. त्याशिवाय ते अंदमान, निकोबार, बेटावरील वायूदलाच्या तळावर चोखपणे आपली जबाबदारी पार पाडलेली आहे. सातारा सैनिक महाविद्यालयात शिकलेल्या व्यंकट तुकाराम मरे यांनी विंलींग्टनच्या सुरक्षा सेवा महाविद्यालयातून पदविका आणि मेहू येथील सेना दलाच्या महाविद्यालयातून पदविका प्राप्त केली आहे. व्यंकट तुकाराम मरे यांनी संयुक्त राष्ट्राच्या कांगोतील प्रजासत्ताक मोहिमेतही महत्वपूर्ण सहभाग नोंदवून देशाचा गौरव वाढविला आहे. व्यंकट तुकाराम मरे यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीबरोबरच आज त्यांनी प्राप्त केलेल्या गौरवशाली वायुदलातील पदोनत्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. त्यांच्या या यशस्वी वाटलीस त्यांचे ग्रामस्थ, वर्गमित्र आणि आप्तेष्टांकडून अभिमान व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या जात आहेत.


Comments

Top