HOME   लातूर न्यूज

लोकनेते विलासरावांच्या जयंतीनिमित्त रक्तदान करुया

अमित विलासराव देशमुख यांचे आवाहन, २५ मे रोजी करा रक्तदान


लोकनेते विलासरावांच्या जयंतीनिमित्त रक्तदान करुया

लातूर: जिल्ह्यासह राज्यातील रक्तपेढीत निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेता, लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस पक्ष तसेच विविध सामाजिक संस्था संघटनांचे प्रतिनिधी यांनी रक्तदान करून आपल्या नेत्याला लोकसेवेच्या माध्यमातून आदरांजली अर्पण करावी, असे आवाहन माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी केले आहे.
आमदार देशमुख यांनी म्हटले आहे की, सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. अपघातातील रुग्ण आणि इतर गंभीर आजाराचे रुग्ण यांना रक्तपेढीच्या माध्यमातून रक्त उपलब्ध होण्यात अडचणी येत असल्याची माहिती प्रसारमाध्यमातून पुढे येत आहे, मागणीच्या तुलनेत रक्तपेढ्यात रक्तसाठा कमी असल्याचे निर्दशनास येत आहे, कडक उन्हाळा त्यात दुष्काळी परिस्थिती यामुळे या दिवसात रक्तदात्यांचे प्रमाण कमी झाले आहे, रक्तपेढ्यात रक्तसाठा कमी असल्यामुळे गंभीर स्वरूपातील रुग्णावर उपचार करण्यात आडचणी येत असल्याचे वैदयकीय क्षेत्रातून सांगण्यात येत आहे. रक्तपेढीतील रक्त तुटवड्याचा विचार करता युवा वर्गाने रक्तदानासाठी पुढे येणे गरजेचे आहे, २६ मे रोजी लोकनेते विलासराव देशमुख यांची जयंती आहे. त्यांनी दिलेली लोकसेवेची शिकवण त्यांच्या लोकसेवेचा वसा पुढे चालू ठेवण्यासाठी या जयंतीचे औचित्य साधून काँग्रेस पक्षाशी संलग्न सर्व सेल तसेच इतर संस्था संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सामाजिक भावनेतून रक्तदान केल्यास ही आपल्या नेत्याला आदरांजली ठरणार आहे.
२५ मे रोजी रक्तदान करावे
२६ मे रोजी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमीत्त जिल्हासह राज्यभरात ठिकठिकाणी आदरांजली वाहण्याचे व इतर उपक्रम अयोजित केले जातात. त्यामुळे, एक दिवस आधी म्हणजे २५ मे रोजीच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रक्तदान करणे योग्य ठरणार आहे असेही आमदार देशमुख यांनी म्हटले आहे.
सदासुख हॉस्पिटल येथे मी रक्तदान करणार
जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना रक्तदानाचे आवाहन करीत असतानाच २५ मे रोजी सकाळी ११ वाजता डॉ. चेतन सारडा यांच्या सदासूख हॉस्पिटलमध्ये आपण स्वत: रक्तदान करणार असल्याचे आमदार अमित देशमुख यांनी म्हटले आहे.


Comments

Top