लातूर: ‘शेतीला पाणी व वीज देणे ही शासनाची कायदेशीर जबाबदारी आहे. उत्पादनावर आधारीत बाजार भावाचा कायदा करणे, बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज देणे हे कायदेशीर आहे. सध्या शेतकरी प्रतिकुल परिस्थितीतून वाटचाल करीत असल्याने आत्महत्या करीत आहेत. आत्महत्या करणे हा त्यावरील उपाय नसून शासन व शेतकऱ्यांने मिळून प्रश्न सोडवावेत. असे मत ज्येष्ठ कृषी तज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेतर्फे मानवतातीर्थ रामेश्वर (रुई), येथे उभारण्यात आलेल्या ‘तथागत भगवान गौतम बुद्ध विहार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विश्वशांती स्मृतिभवन’ येथे ‘तथागत गौतम बुद्ध जयंती’ साजरी करण्यात आली. त्यावेळी डॉ. बुधाजीराव मुळीक बोलत होते. यावेळी ज्येष्ठ कृषीतज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री (DICCI)चे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांना विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते ‘तथागत गौतम बुध्द पंचशील विश्वशांती पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि घोंगडी हे पुरस्काराचे स्वरूप होते.
या प्रसंगी माजी खासदार गोपाळराव पाटील, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, थोर साहित्यिक व लेखक प्रा.रतनलाल सोनग्रा, ज्येष्ठ दलित नेते मोहनराव माने व लातूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचे सभापती संजय दोरवे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सौ. सीमा मिंलिंद कांबळे, शेतीनिष्ठ कर्मयोगी, ह.भ.प. तुळशीराम दा. कराड, प्रगतीशील शेतकरी काशीराम दा. कराड, विनायक पाटील, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक रमेशअप्पा कराड, सरपंच सौ. सुधामती नारायण कराड आणि उपसरपंच कमाल राजेखाँ पटेल यांचीही उपस्थिती होती. डॉ. बुधाजीराव मुळीक म्हणाले, शेतकऱ्यांच्या आधारावर सर्वांचे चांगले चालते पण शेतकऱ्यांचे वाईट होते. त्यामुळे बुध्द पोर्णिमेच्या निमित्त शासनाने शेतकऱ्यांसाठी चांगला कायदा करावा अशी मागणीही त्यांनी केले. तसेच भगवान गौतम बुध्दांनी जीवनातील पाच तत्वे सांगितले, ते म्हणजे चोरी करणार नाही, व्याभिचार करणार नाही, असत्य बोलणार नाही, मद्यपान करणार नाही आणि हिंसा करणार नाही. याचे पालन सर्वांनी केल्यास समाजात विश्वशांती निर्माण होईल.
Comments