लातूर: लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कांही खरेदीदार व्यापार्यांनी गेल्या सहा महिण्यापूर्वी लिलाव पुकारून कोट्यवधी रूपयांचा माल खेरदी केला, परंतु त्या मालाचे पैसे खेरदीदार गोवर्धनराव नरसिंगराव पल्लोड यांनी दिले नाहीत. खरेदीदाराकडून कोट्यवधी रूपयांचे विकलेल्या मालाचे पैसे येणे आहे. त्या खरेदीदार व जामीनदार यांच्यावर कारवाई करून कृषी उत्पन्न बाजार समिती पैसे वसूल करू शकते, तसा न्याय आपण सभापती असताना शेतकरी व आडत्यांना न्याय दिला होता, याची आठवण करून देऊन तशीच कारवाई करून आडत व्यापार्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. आडते व या शेतकर्यांच्या प्रश्नासाठी आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे प्रतिपादन बाजार समितीचे माजी सभापती, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले. खरेदीदाराकडून पैसे तात्काळ मिळावे, या मागणीसाठी मार्केट कमिटी परिसरात उपोषणास बसलेल्या आडत व्यापारी असोसिएशनला भेट देऊन विश्वास दिला.
पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, आडत व्यापारी अथवा शेतकर्यांच्या मालाचे पैसे वसूल करून देण्याची प्रमुख जबाबदारी बाजार समितीची असते, ती त्यांना टाळता येत नाही. तसेच हमाल, गाडीवान, आडते, गुमास्ता, शेतकरी बरोबर खरेदीदरांनासुध्दा आपण आपल्या सभापती काळात न्याय दिल्याची माहिती कव्हेकर यांनी दिली. आडत्यांच्या प्रश्नासाठी आपण पणन व सहकार मंत्री तसेच पणन संचालक यांच्याकडेही प्रयत्न करुन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. यावेळी खरेदीदार गोवर्धन पल्लोड यांच्या विरोधात उपोषणास बसलेले आडते व्यापारी व असोसियशनचे अध्यक्ष अजिंक्य सोनवने, सचिव प्रशांत कोरे, तसेच आडते तुळशीदास दुडीले, गजानन काळे, विठ्ठलराव वीर, गणपतराव जाधव, यशवंत बडे, श्रीकिशन चव्हाण, शरद शिंदे आंदीसह एकूण पंचवीस व्यापारी उपस्थित होते.
Comments