लातूर : जिल्हा परिषदेच्या शाळांतून दर्जेदार शिक्षण दिले जात असतानाही या शाळातील पटसंख्या मागील काही वर्षात कमी झाली. ही पटसंख्या वाढविण्यासाठी मागील वर्षांपासून प्रयत्न केले जात असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पटसंख्या वाढविण्यासाठी गावपातळीवर सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे असे मत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती रामचंद्र तिरुके यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढीसाठी निलंगा येथे आयोजित प्रवेश संकल्प सभेत तिरुके बोलत होते. या सभेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातूरे, समाजकल्याण सभापती संजय दोरवे, पंचायत समिती सभापती अजित माने, उपसभापती ज्ञानेश्वर वाकडे, शिक्षण अधिकारी वैशाली जामदार, जि .प. सदस्य संतोष वाघमारे, शिक्षण समितीचे स्विकृत सदस्य अरुण सोळुंके, पंचायत समिती सदस्य कालिदास सोमवंशी, हरिभाऊ काळे, तुकाराम सोळंके यांच्यासह प्रमोद हुडगे, एस एन बिरादार, सुशीलकुमार पांचाळ यांची उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना रामचंद्र तिरुके म्हणाले की, मागील १० वर्षात जिल्हा परिषद शाळांचा पट ४० हजारने कमी झाला. कमी झालेला हा पट वाढविण्यासाठी मागील वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभत आहे. गतवर्षी ७ ते ८ हजाराच्या पट वाढला. यावर्षीही त्याच प्रमाणात पट वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेत दर्जेदार शिक्षण मिळते. या शाळातील शिक्षकही गुणवंत आहेत. उच्च दर्जाचे शिक्षण मिळत असतानाही शाळांचा पट कमी का होतोय? याचा विचार करण्याची गरज आहे. पटसंख्या वाढीसंदर्भात गावपातळीवर जनजागृती करणे आवश्यक आहे. यासाठी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत, असे ते म्हणाले. इंग्रजी माध्यमाच्या शाळांसोबत आपली स्पर्धा आहे. ही स्पर्धा जिंकण्यासाठी आहे, इंग्रजी शाळांना हरवण्यासाठी नाही. समाजातील गोरगरीब पालकांच्या पाल्याना जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण मिळते. गणवेश, पुस्तके आणि संपूर्ण शिक्षण मोफत मिळते. हे शिक्षण दर्जेदार आहे हे पटवून देण्यासाठी या संकल्प सभा आयोजित करण्यात आल्याचेही तिरुके म्हणाले. या सभेस तालुक्यातील गावांचे सरपंच, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, शालेय समिती अध्यक्ष आणि मुख्याध्यापक अपेक्षित होते. बैठकीस उपस्थित असणाऱ्या सरपंचाना शाळा दुरुस्तीसाठी ५ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा उपाध्यक्ष तिरुके यांनी यावेळी केली. अध्यक्ष मिलींद लातूरे, सभापती दोरवे आणि माने यांनीही मार्गदर्शन केले. गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी प्रास्ताविकात गतवर्षी २ हजार ८८८ ने पट वाढला असून यावर्षी ३ हजार ५०० पटसंख्या वाढीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे सांगितले. तालुक्यातील सर्व शाळा डिजिटल असून एकही शिक्षक अतिरिक्त नसल्याचे ते म्हणाले.
Comments