शिरूर अनंतपाळ : गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमधून विद्यार्थ्याना शिक्षणाचे धडे दिले जातात. बदलत्या काळात शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही देण्यात येत आहेत. यामुळे जि. प. शाळांचा पट निश्चितपणे वाढेल, असे मत शिक्षणाधिकारी वैशाली जामदार यांनी व्यक्त केले. या शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी दिले.
शिरूर अनंतपाळ येथे आयोजित सभेत जामदार बोलत होत्या. जिल्हा परिषद शाळांचा पट वाढविण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी या संकल्प सभांचे आयोजन करण्यात येत आहे. शिरूर अनंतपाळ व देवणी येथे मंगळवारी सभा झाल्या. शिरूर अनंतपाळ येथे आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती सौ. वर्षाताई भिक्का तर मार्गदर्शक म्हणून रामचंद्र तिरुके यांची उपस्थिती होती. यावेळी नगराध्यक्षा शोभाताई गायकवाड, गटविकास अधिकारी नंदकिशोर शेरखाने, गट शिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनराज पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना जामदार म्हणाल्या की, जिल्हा परिषदेच्या शाळात गुणात्मक शिक्षण दिले जाते. स्पर्धेच्या युगात आता या शाळाही बदलल्या आहेत. शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा आता या शाळांमध्ये मिळत आहेत. काळाची गरज ओळखून या शाळात सेमी इंग्रजी सुरू करण्यात आले आहे. यामुळेच शाळांची पटसंख्या वाढत असल्याचे त्या म्हणाल्या. उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या शाळातून गुणात्मक शिक्षण देण्यासोबतच विद्यार्थी घडवण्याचे काम केले जाते. मागील वर्षापासून जि .प. शाळात सेमी इंग्रजी सुरू करण्यात आले आहे. याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षी पटसंख्या ०७ हजारने वाढली. या वाढीचे संपूर्ण श्रेय शिक्षक आणि त्यांनी दिलेल्या शिक्षणाला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शाळा प्रगत व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. शिक्षकांना आपले काम करताना समाधान मिळावे, यासाठी त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. शिक्षकांचे वेतन ऑनलाईन करण्यात आले आहे. जी पी एफ स्लीप देखील ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. वैद्यकीय बिलांचा प्रश्न सोडवण्यात आला आहे. पटसंख्या वाढीसाठी स्थानिक पातळीवर शाळा व्यवस्थापन समिती आणि लोकप्रतिनिधीनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. गोविंदराव चिलकुरे, धनराज पाटील, दत्ता शिरूरे, प्रदीप ढगे, प्रमोद हुडगे यांनीही यावेळी विचार व्यक्त केले . या सभेस तालुक्यातील विविध गावांचे सरपंच आणि शाळा व्यवस्थापन समित्यांचे अध्यक्ष उपस्थित होते.
Comments