लातूर: विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख व अदिती देशमुख यांच्या उपस्थितीत वॉकिंग ट्रॅक व उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. बाभळगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या पुढाकारातून वॉकिंग ट्रॅकची उभारणी व उद्यान तयार करण्यात आले आहे. ग्रामीण भाग व गावचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर गावात सर्व सोयी सुविधा हव्या आहेत. यासाठी लोकप्रतिनिधी सोबत ग्रामस्थांचा देखील पुढाकार महत्वाचा आहे. लातूर तालुक्यातील बाभळगाव या ठिकाणी सर्वशिक्षा अभियान, गावातील रस्ते, नाल्या, पथदिवे, स्वच्छता, पाणी पुरवठा व्यवस्थापन यासोबतच ग्रामस्थांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी ग्रामीण रुग्णालय अशा अनेक सुविधा या ठिकाणी उपलब्ध असून आता यात भर पडलीय ती वॉकिंग ट्रॅक व उद्यानाची. बाभळगाव येथे वैशाली देशमुख व अदिती देशमुख यांच्या संकल्पनेतून व्यायाम करणे, फेरफटका मारणे व विरंगुळ्यासाठी वॉकींग ट्रॅक तर हरित बाभळगाव करण्यासाठी उद्यानाची उभारणी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या पुढाकारातून करण्यात आली आहे. या वॉकिंग ट्रॅक व उद्यानाचे लोकार्पण विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या जयंतीदिनी आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते व अदिती अमित देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वॉकिंग ट्रॅक व उद्यानासाठी सरपंच सतीश रेड्डी व उपसरपंच अविनाश देशमुख यांचे सहकार्य बाभळगाव ग्रामस्थांना मिळाले आहे. ही सुविधा उभारण्यात आल्याने आता गावाच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. यावेळी संतोष देशमुख, महादेव मुळे, एन. आर. देशमुख, गणपतराव भाडूळे, अभियंता संजय आवाळे, सतीश कुटवाडे, नामदेव शिंदे, श्रीकृष्ण पिटले यांच्यासह बाभळगाव ग्रामंस्थ उपस्थित होते.
Comments