लातूर : मांजरा परिवारातील मांजरा आणि जागृती या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून घेतलेल्या उसाला ३८४ रुपयांचा हप्ता जाहीर केला आहे. या कारखान्यांनी यापूर्वी दिलेले पैसे आणि आताचे ३८४ रुपये मिळून एकूण २ हजार ३३४ रुपयांचा भाव शेतकऱ्यांना मिळाला असून मांजरा परिवाराने ही रक्कम देऊन पेरणीच्या काळात शेतकऱ्यांची अडचण दूर केली असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लातूर व उस्मानाबाद जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
मांजरा परिवारातील मांजरा, विकास, रेणा आणि जागृती हे साखर कारखाने शेतकऱ्यांच्या उसाला दरवर्षी योग्य भाव देतात. माजी मंत्री दिलीपराव देशमुख व आ. अमित देशमुख यांच्या नेतृत्वात चालणाऱ्या या कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती केलेली आहे. मराठवाडा आणि महाराष्ट्रात सर्वाधिक भाव देण्याची मांजरा परिवाराची परंपरा आहे. या परंपरेला जागत परिवारातील कारखान्यांनी यावर्षीही १ हजार ७५० रुपयांचा पहिला हप्ता दिला होता. त्यानंतर या कारखान्यांनी १०० रुपयांचे दोन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. आता ३८४ रुपयांचा हप्ता जाहीर करण्यात आला असून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले आहेत. रेणा साखर कारखान्यानेही ३७१ रुपयांचा हप्ता जाहीर केला आहे. जून महिन्यात शेतकऱ्यांना पेरणी करावी लागते. पेरणीसाठी बी - बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे लागतात. मागच्या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने दोन्ही हंगामात पीक हाती लागले नाही. यामुळे शेतकऱ्यांचा खिसा रिकामा आहे. अशा स्थितीत खाजगी सावकारांचे पाय धरण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नव्हता. अशा स्थितीत मांजरा परिवारातील मांजरा आणि जागृती या दोन कारखान्यांनी ३८४ रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. हा पैसा शेतकऱ्यांना पेरणीच्या कामी येणार आहे. या कृतीतून मांजरा परिवार हाच शेतकऱ्यांचा खरा कैवारी असल्याचे दिसून येत आहे. परिवारातील इतर कारखानेही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणार असून यामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे. याबद्दल लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संपर्क प्रमुख राजेंद्र मोरे यांनी मांजरा परिवाराचे प्रमुख माजी मंत्री दिलीपराव देशमुख व आ. अमित देशमुख यांचे आभार मानले आहेत.
Comments