चाकूर: स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषदेच्या शाळा कुठेही कमी नाहीत. या शाळातून सर्वसामान्य आणि गोरगरीब नागरिकांच्या मुलांना शिक्षण मिळते, असे प्रतिपादन आ. विनायकराव पाटील यांनी केले. जिल्हा परिषद शाळातील पटसंख्या वाढविण्यासाठी आयोजित तालुकास्तरीय संकल्प सभेत आ. पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती सुनिता डावरे तर व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, पंचायत समिती उपसभापती वसंतराव डिघोळे, सदस्य महेश व्हत्ते, सज्जनकुमार लोणाळे, शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली जामदार, गटविकास अधिकारी बोपनवार, गटशिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्यासह सरपंच संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. आ. पाटील म्हणाले की, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक गुणवंत आहेत. त्यांनी आपली गुणवत्ता दाखवून दिली पाहिजे. पटसंख्या कमी झाली तर शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. बदली होवून बाहेरगावी जायचे नसेल तर पटसंख्या वाढवण्याचे काम शिक्षकांनी केले पाहिजे. सर्वानी एकत्रित प्रयत्न केले तर गरीब विद्यार्थ्यांचे कल्याण करण्याची क्षमता जिल्हा परिषदेच्या शाळेत असल्याचेही ते म्हणाले. रामचंद्र तिरुके म्हणाले की, गरीबांच्या लेकरांना शिकवणाऱ्या शाळा म्हणून जिल्हा परिषद शाळांची ओळख आहे. तरीही पटसंख्या का कमी झाली याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. वास्तविक आज जिल्हा परिषद शाळा पूर्णपणे डिजिटल झाल्या आहेत. या शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन का बदलला याचा शोध घेण्याची गरज आहे. या शाळाना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी आपले कौशल्य वापरण्याची गरज आहे. गावचे सरपंच आणि शालेय समिती अध्यक्षांनी या कामात त्याना सहकार्य केले पाहिजे. गुणवत्तेच्या आधारावर पटसंख्या वाढविण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. खाजगी इंग्रजी शाळा उद्याचा नागरिक बिघडविण्याचे काम करीत आहेत. लोकप्रतिनिधीनी या शाळांचा दर्जा तपासला पाहिजे. या शाळांच्या उलट आपल्या शाळेतील शिक्षक गुणवत्ताधारक आहेत. यावर्षी तालुक्यात किमान दोन हजार पटसंख्या वाढली पाहिजे, असे तिरुके म्हणाले. प्रारंभी गटशिक्षणाधिकारी फुटाणे यांनी प्रास्ताविकात तालुक्याच्या शिक्षण क्षेत्राचा आढावा घेतला. या संकल्प सभेस तालुक्यातील मुख्याध्यापक, सरपंच, शालेय समित्यांचे सभापती यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Comments