HOME   लातूर न्यूज

माझ्या जीवनाचा मीच शिल्‍पकार

सुभाषराव देशमुख यांचे मत: प्रयागअक्‍का जीवनगौरव पुरस्‍कार प्रदान


माझ्या जीवनाचा मीच शिल्‍पकार

लातूर : माझ्या जीवनाचा मीच शिल्‍पकार आहे, हवे ते मी घडवू शकतो आणि मी सर्वांना घेऊन चालणार, हे सूत्र लक्षात ठेवून कार्य केल्यास हा समाज प्रगतीपथावर जाईल. याचे उत्तम उदाहरण म्‍हणजे रामेश्वर रूई या गावाची माती. येथूनच सर्वधर्म समभावाची कल्‍पना येते. असे मत नाशिक येथील नवसंजीवनी वर्ल्ड पीस रिसर्च फाउंडेशनचे कार्यकारी विश्वस्‍त सुभाषराव देशमुख यांनी मांडले.
विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी, पुणेतर्फे पूर्णब्रह्मयोगिनी त्‍यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्‍का कराड यांच्‍या सहाव्‍या पुण्यस्‍मरण स्‍मृतिदिनाचे औचित्‍य साधून, शैक्षणिक, सामाजिक आणि अध्यात्‍माचा समन्‍वयातून आयुष्यभर समाजप्रबोधन व सांप्रदायिक सद्भावनेचे सेवाभावी कार्य, समर्पित व निरपेक्ष भावनेने अव्‍याहतपणे करून, समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या पंचकन्‍या मधील नंदूरबार येथील ज्‍येष्ठ समाजसेविका व आदिवासी मुला मुलींसाठी कार्य करणाऱ्या श्रीमती निर्मला देवकी नवल सोनीस, बीड येथील ज्‍येष्ठ कीर्तनकार व प्रवचनकार ह.भ.प. सौ. प्रज्ञा भरतबुवा रामदासी , पुणे येथील आरोग्‍य सेवा देणाऱ्या डॉ. शशिकला अनंत सांगळे, पुणे येथील ज्‍येष्ठ समाजसेविका व एमआयटी ज्‍युनिअर कॉलेजच्‍या प्राचार्या डॉ. रोहिणी वासुदेव पटवर्धन आणि पुणे येथील आदिवासी गरीब कुटुंबाची पालन पोषणाची सेवा करणाऱ्या ज्‍येष्ठ समाजसेविका सौ. मधुरा मुकुंद भेलके या पंचकन्‍यांना पूर्णब्रह्मायोगिनी त्‍यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्‍का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्‍काराने सन्‍मानीत करण्यात आले. त्‍याच प्रमाणे पुणे येथील आदिवासी मुलांसाठी आश्रमशाळा चालविणाऱ्या व ज्‍येष्ठ समाजसेविका सौ. सुशिला रतनलाल सोनाग्रा यांना विशेष जीवन गौरव पुरस्‍काराने सन्‍मानीत करण्यात आले. सन्‍मानपत्र, स्‍मृतिचिन्‍ह, सुवर्णपदक व रोख ११ हजार रूपये असे पुरस्‍काराचे स्‍वरूप होते. यावेळी लातूरचे माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील हे सन्‍मानीय प्रमुख पाहुणे व अध्यक्ष म्‍हणून उपस्‍थित होते. तसेच ज्‍येष्ठ शास्‍त्रज्ञ व कृषीतज्ञ डॉ. शिवाजीराव शिंदे हे सन्‍माननीय पाहुणे म्‍हणून उपस्‍थित होते.
यावेळी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्‍थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड, सौ. उर्मिला विश्वनाथ कराड, शेतीनिष्ठ कर्मयोगी, ह.भ.प. तुळशीराम दा. कराड, प्रगतीशील शेतकरी काशीराम दा. कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक रमेशअप्पा कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, थोर साहित्यिक व लेखक प्रा. रतनलाल सोनग्रा, कमल राजेखाँ पटेल, डॉ. हनुमंत कराड, दिलीपराव पटवर्धन, ह. भ. प. नारायण महाराज उत्तरेश्वर पिंप्रीकर व राजेश कराड हे उपस्‍थित होते.


Comments

Top