HOME   लातूर न्यूज

राज्य मंत्री मंडळाची बैठक लातूरात घेण्याची मागणी

मराठवाड्याच्या हक्‍काच्या पाण्यासाठी लढा उभारण्याची गरज -डॉ.व्यंकटेश काब्दे


राज्य मंत्री मंडळाची बैठक लातूरात घेण्याची मागणी

लातूर : मराठवाड्यावर नेहमी निसर्गाची अवकृपा व शासनाची दिशाहीन भूमिका राहिलेली असून याच्या विकासासाठी सरकारने अनुशेष जाहीर केला, वैधानिक विकास मंडळाची स्थापना केली, परंतु कांही ठोस पावले न उचलल्यामुळे मराठवाडा हा अद्याप मागासलेलाच राहिलेला असून त्यात मराठवाड्याच्या हक्‍काचे पाणी जायकवाडी, कृष्णा, गोदावरी व उजनी धरणातून मिळण्यासाठी या पूर्वी मराठवाडा जनता विकास परिषदेने मुख्यमंत्री, मंत्रीगट व न्यायालयात दाद मागितली, परंतु त्यातून बैठका व समित्या नेमणे या व्यतिरिक्‍त काहीच झाले नाही, आता या प्रश्‍नी ठोस आंदोलनाशिवाय, लढा तीव्र केल्याशिवाय पर्याय नसल्याचे नमूद करून या बाबतीत लातूर सक्षम असून येथील वैचारिक, सामाजिक व राजकीय दबदबा मराठवाड्यात असल्यामुळे लातूरलाच राज्यमंत्रीमंडळाची बैठक घेण्यात यावी व येथील मागे पडलेला विभागीय आयुक्‍तालयाचा प्रश्‍न सुटावा, अशी मागणी मराठवाडा विकास परिषदेचे अध्यक्ष माजी डॉ.व्यंकटेश काब्दे यांनी स्वामी विवेकांनद पॉलिटेक्निक कॉलेज सभागृहात मराठवाडा अनुशेष संदर्भात आयोजित केलेल्या दुसर्‍या, सर्वपक्षीय व विचारवंताच्या बैठकीत प्रमुख अतिथी म्हणून बोलताना केली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ विचारवंत माजी डॉ. जेएम वाघमारे, आयोजक शिवाजीराव पाटील कव्हेकर, अ‍ॅड. मनोहरराव गोमारे, डॉ. सोमनाथ रोडे, डॉ. नागोराव कुंभार, अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, वैजनाथ शिंदे, बस्वराज पाटील नागराळकर, डॉ.विठ्ठलराव मोरे, शिवाजी नरहारे, अ‍ॅड.धनंजय पाटील, बी.टी.कदम, एमएनएस बँकेचे एसआर मोरे, प्रा. बीव्हीमोतीपवळे, प्रा. सतीश यादव, जननायक संघटनेचे बाबासाहेब कोरे, बाबासाहेब देशमुख, आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. काब्दे म्हणाले की, मराठवाड्यातील प्रश्‍नाकडे हे सरकार व या भागातील निवडून गेलेले लोकप्रतिनिधी फारसे गांभिर्याने पाहत नाहीत. पाणी प्रश्‍नासाठी मराठवाडा स्तरावरची सिंचन-पाणी नव्याने परिषद निर्माण करून त्यात सर्व संघटना पक्ष सर्वपक्षीय खासदार, आमदार यात समाविष्ठ करून ठोस भूमिका घेणे गरजेचे असून शिक्षण व उद्योगाच्या प्रश्‍नासाठी सरकार फारसे लक्ष देत नाही. या भागातील या विद्यार्थ्यांना गुणवत्तेवर उच्च शिक्षणात आरक्षण हवे, उद्योगाबद्दल ठोस धोरण जाहीर करावे व मराठवाड्याच्या दुष्काळाचे समूळ निर्मूलन करण्यासाठी आता ०२ टक्के असलेले वनक्षेत्र ३३ टक्के उभारावे या सर्व प्रश्‍नासाठी सर्वजन एकत्र येऊन सरकारच्या मानगुटीवर बसल्याशिवाय आंदोलनाद्वारे दबाव टाकण्यासाठी हा मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष दूर होणार नसल्याचे नमूद करून या महत्वाच्या प्रश्‍नी शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी नियोजन करून पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करून आपण पहिजे तेव्हा सोबत असल्याची ग्वाही दिली.


Comments

Top