HOME   लातूर न्यूज

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी शाळांचा दर्जा वाढवावा

१० हजाराने पटसंख्या वाढवा ४० कोटींचा निधी देतो- पालकमंत्री


जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी शाळांचा दर्जा वाढवावा

लातूर: आज सुरू असणारा शिक्षणाचा बाजार थांबविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी शाळांचा दर्जा वाढवावा. विद्यार्थी आणि शिक्षकांचा आत्मविश्वास वाढवावा, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले. जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि पंचायत समितीच्या वतीने आयोजित प्रवेश संकल्प सभेत मार्गदर्शन करताना पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातूरे तर व्यासपीठावर नवनिर्वाचित खासदार सुधाकर शृंगारे , जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती रामचंद्र तिरुके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर, बांधकाम सभापती प्रकाश देशमुख, कृषी सभापती बजरंग जाधव, समाजकल्याण सभापती संजय दोरवे, सदस्य सुरेश लहाने, गोविंद चिलकुरे, वैशाली जामदार, पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, कोअर कमिटीचे सदस्य प्रमोद हुडगे यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री म्हणाले की, जीवन कसे जगावे याचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतून दिले जाते. माझ्या घरातील सर्व व्यक्तीनी जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच शिक्षण घेतलेले आहे. पण जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये काळाप्रमाणे बदल झाला पाहिजे. अनेक ठिकाणी शाळांच्या इमारती निजामकालीन आहेत. या इमारतींची दूरुस्ती करण्यासाठी राज्यात सर्वाधिक २२ कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला. अजूनही निधी कमी पडू दिला जाणार नाही. यावर्षी १० हजाराने पटसंख्या वाढवा. ४० कोटी रुपयांचा निधी देतो, असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी बोलताना खासदार सुधाकर शृंगारे यांनी आपणही जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकलो असल्याचा उल्लेख केला. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत जिल्हा परिषदेसारखे शिक्षण मिळत नसल्याचे ते म्हणाले.
मुख्य कार्यकारी अधीकारी इटनकर यांनी यावर्षी जिल्हा परिषद शाळांच्या २५२ खोल्या दुरुस्त करणार असल्याचे सांगितले. मुलांमधे कसलीही कमतरता नाही. चांगले शिक्षण देऊन मुलांना घडवा. जिल्हा परिषदेने शिक्षकांना सर्व काही दिले आहे. आता तुमची वेळ आली आहे. मुलांची गैरसोय चालणार नाही. गावच्या सरपंचानी मिळणाऱ्या निधीतील २५ टक्के निधी शिक्षण आणि आरोग्यासाठी राखीव ठेवावा असेही ते म्हणाले.
प्रास्ताविक करताना उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी शिक्षण विभागाच्या वतीने गतवर्षीपासून राबविण्यात येणाऱ्या मोहिमेची माहिती दिली. मागच्या वर्षी ७ हजाराने पट वाढला. यंदा १० हजार पट वाढीचे उद्दिष्ट असल्याचे सांगत गुरुजींनी स्वतःच्या अस्तित्वासाठी शाळा टिकवाव्यात असे आवाहन केले. ऋतुजा आणि अनुज या दोन चिमुकल्यांनी संभाषण सादर करत जिल्हा परिषद शाळा गुणवत्तेने परिपूर्ण असल्याचे दाखवून दिले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. तृप्ती अंधारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे संचलन विवेक सौताडेकर तर आभार प्रदर्शन तृप्ती अंधारे यांनी केले.


Comments

Top