रेणापूर /प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळामधे गरीबांच्या मुलांना शिक्षण दिले जाते .या शाळातील शिक्षक गुणवंत आहेत. त्यामुळेच पटसंख्या वाढवून गरीबांची मुलं गुणवंत शिक्षकांच्या हाती द्यायची आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती रामचंद्र तिरुके यांनी केले. रेणापूर येथे आयोजित तालुकास्तरीय संकल्प सभेत तिरुके बोलत होते. जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी आयोजित या सभेच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे उपसभापती अनंत चव्हाण तर व्यासपिठावर जिल्हा परिषद सदस्य सुरेश लहाने, उद्धव चेपट, पंचायत समिती सदस्य बायनाबाई साळवे, नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, गटविकास अधिकारी मोहन अभंगे, गटशिक्षणाधिकारी वंदना फुटाणे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
तिरुके म्हणाले की, घटलेल्या पटसंख्येला फक्त शिक्षकच जबाबदार नाहीत. गावांचे लोकप्रतिनिधीही तेवढेच जबाबदार आहेत जिल्हा परिषदेचे शिक्षक गुणवंत आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळा डिजिटल आहेत. मागच्या वर्षी पटसंख्या वाढल्याने ३६० भुमिपुत्राना लातुरला बदलुन येता आले. शिक्षकांसाठी सर्व आवश्यक बाबी आम्ही केल्या आहेत .आता त्यांची जबाबदारी आहे. शिक्षकांनी आपलीही मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत घातली तर पटसंख्या वाढण्यास मदत होणार आहे. यामुळे समाजाचा शिक्षकांवरील विश्वास वाढणार आहे. तालुक्यात यावर्षी १३८८ प्रवेशपात्र मुले आहेत. यंदा १५०० प्रवेश झाले पाहिजेत, असेही तिरुके म्हणाले.
जिल्हा परिषद सदस्य लहाने यांनी लोकप्रतिनिधी आणि केंद्रप्रमुखानी सामुहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. नगराध्यक्ष आकनगिरे यांनी देशाचे भवितव्य शिक्षकांच्या हाती असल्याचे सांगितले. उपसभापती चव्हाण यांनी पटसंख्या वाढविण्यासाठी झटणारे तिरुके हे पहिले शिक्षण सभापती असल्याचे सांगितले. शिक्षणाधिकारी जामदार यांनी शाळा सक्षम असल्याचे सांगून
संख्या वाढणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. गटविकास अधिकारी अभंगे, प्रमोद हुडगे यांनीही मनोगत व्यक्त केले. गटशिक्षणाधिकारी फुटाणे यांनी प्रास्ताविक केले. या सभेस तालुक्यातील मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, सरपंच आणि शालेय शिक्षण समिती सभापती उपस्थित होते.
Comments