लातूर : मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांच्या पुढाकारातून औसा विधानसभा मतदारसंघातील औसा, लामजना आणि कासारशिरसी या तीन महत्त्वाच्या व मोठ्या गावात बसस्थानकांना मंजुरी मिळाली असून ऑगस्ट महिन्यात या तीनही बसस्थानकांचे भूमिपूजन संपन्न होणार आहे. अभिमन्यू पवार यांनी या मतदारसंघाचे पालकत्व स्विकारले आहे. यानिमित्ताने ते या परिसराचे सातत्याने दौरे करीत आहेत. नागरिकांच्या अडचणी समजावून घेत आहेत. दौरे करत असताना तालुक्याचे ठिकाण असणार्या औसा तसेच सीमावर्ती भागातील कासारशिरसी व मतदारसंघातील मोठे गाव लामजना येथील बसस्थानकांच्या अडचणी त्यांच्या लक्षात आल्या. प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता या तीनही ठिकाणी नवीन बसस्थानकांची उभारणी करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. या माध्यमातून औसा, लामजना व कासारशिरसी येथे नव्या बसस्थानकांना मंजुरी मिळाली आहे.
सोमवारी सकाळी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी व वास्तुविशारद यांच्यासमवेत परिवहन मंत्री व अभिमन्यू पवार यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत या तीनही बसस्थानकांना मंजुरी देण्यात आली. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नवीन बसस्थानकांच्या उभारणी संदर्भातील सर्व प्रक्रिया १५ जुलैपर्यंत पार पाडण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात या तीनही बसस्थानकांचे भूमिपूजन संपन्न होणार असल्याची माहिती अभिमन्यू पवार यांनी दिली. औसा मतदारसंघातील नागरिकांची अडचण लक्षात घेता परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नव्या बसस्थानकांना मंजुरी दिली. याबद्दल मतदारसंघातील जनतेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री दिवाकर रावते, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांचे आभार मानले जात आहेत.
Comments