लातूर: लातूर शहरास पाणीपुरवठा करणार्या मांजरा (धनेगाव) धरण हा शाश्वत स्त्रोत नसून वारंवार होणारा अत्यल्प पाऊस व त्यामुळे निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती यामुळे या धरणातून लातूर शहरात कायमस्वरूपी पिण्याचा पाणीपुरवठा करणे अशक्यप्राय आहे. याकरिता उजनी धरण येथून लातूर शहरास पाणीपुरवठा योजना मंजूर करणे ही काळाची गरज आहे. याबाबतची मागणी सरकारकडून प्रलंबित ठेवण्यात येत आहे. उजनी धरण येथून मांजरा धरणास बंद कालवा जोडून अथवा उजनी धरण येथून थेट लातूर करिता पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येणे गरजेचे आहे. राज्य सरकार च्या वतीने याकरिता प्रकल्प अहवाल तयार करण्यात आलेला असून याकरिता ८०० कोटी खर्च अपेक्षित आहे. परंतु काही भागातील लोकप्रतिनिधींच्या तक्रारींमुळे शासनाच्या वतीने ही योजना मंजूर केली जात नाही. ती मंजूर करावी अशी मागणी जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे. या निमित्ताने १५ जून रोजी होणार्या निती आयोगाच्या बैठकीकडे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुका दरम्यान केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी लातूर येथे उजनीचे पाणी उपलब्ध करून देण्याबाबत सूतोवाच केले होते.
या सर्व बाबींचा विचार करता लातूर व मराठवाडा येथील सातत्याने होणार दुष्काळ व पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष कायमस्वरूपी संपविण्याकरिता व शाश्वत पाणीपुरवठा प्रकल्पांचा अभाव लक्षात घेता लातूर शहराकरिता शाश्वत कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना ही केवळ उजनी ते लातूर हाच एकमेव पर्याय असल्याने मंत्रिमंडळ बैठकीत सकारात्मक निर्णय घेवून लातूरकरांच्या हक्काचे पाणी मिळवून देवून या भागातील जनतेला न्याय मिळवून द्यावा याबाबत जिल्हाधिकारी लातूर यांच्या मार्फत हे निवेदन देण्यात आले. यावेळी लातूर मधील विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे, साहित्यिक विवेक सौताडेकर, चित्रकार शिवाजी हांडे, ऑटोचालक युनियनचे अध्यक्ष त्रंबक स्वामी, उद्योजक राजन गिरवलकर, परिवहन समिती सदस्य राम चलवाड, विद्यापीठ कृती समिती चे अड. प्रदीपसिंह गंगणे, ताहेर सौदागर, लॅब टेक्निशियन असोसिएशनचे दत्तात्रय अपसिंगेकर, प्रदीप शिंदे, दक्षता समिती सदस्य अड. सुनील शेंडगे, सामाजिक कार्यकर्ते अड. गोपाळ बुरबुरे, सुरज राजे, राम गोरड, सुभाष पंचाक्षरी, महेश इंगळे, विशाल चामे, कमलाकर सुरवसे, श्रीनिवास गाडेकर, सचिन पुरी इत्यादी उपस्थित होते.
Comments