लातूर : राजकारणात मी अगदीच नवखा होतो. दोन-अडीच वर्षांपूर्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलो. या सभागृहात काम केले . येथील कामकाजात सहभाग घेतला. या कामकाजाचा मला आता संसदेत काम करण्यास उपयोग होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य तथा नवनिर्वाचित खासदार सुधाकर शृंगारे यांनी केले. लातूर जिल्हा परिषदेचे सदस्य असणारे सुधाकर शृंगारे यांची खासदार म्हणून जनतेने निवड केली लोकसभा निवडणुकीत ते प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. आपल्यातील सदस्य खासदार झाला याबद्दल जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शृंगारे यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना खा. शृंगारे बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्ष मिलिंद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, बांधकाम सभापती प्रकाश देशमुख, कृषी सभापती बजरंग जाधव, समाजकल्याण सभापती संजय दोरवे, महिला बालकल्याण सभापती संगीता घुले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन इटनकर, भाजपा गटनेते महेश पाटील, कॉंग्रेसचे गटनेते संतोष तिडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंचकराव पाटील, धीरज देशमुख यांच्यासह सर्व सदस्य व मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी पृथ्वीराज शिवशिवे यांनी खा.सुधाकर शृंगारे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यास सर्वपक्षीय सदस्यांनी बाके वाजवून अनुमोदन दिले. त्यानंतर अध्यक्ष मिलिंद लातुरे व उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके व सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते खा. शृंगारे यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना खा. शृंगारे म्हणाले की, मी व्यावसायिक म्हणून काम करत होतो . अडीच वर्षांपूर्वी मला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. सभागृहात मी खूप काही शिकलो. ही शिदोरी आता मी संसदेत घेऊन जात आहे. लातूर जिल्ह्याला शिवराज पाटील चाकुरकर, स्व. विलासराव देशमुख, स्व. गोपीनाथराव मुंडे, माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांच्यासारख्या नेत्यांची परंपरा आहे. ही परंपरा जपण्याचे काम माझ्या हातून होईल. या नेत्यांना आदर्श मानून मी काम करणार आहे. लातूर जिल्हा दुष्काळमुक्त करणे हे आपले पहिले उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत. ग्रामीण भागाच्या विकासासाठी अधिकाधिक निधी खेचून आणण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. आपण जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे ग्रामीण भागाकडे माझे विशेष लक्ष असणार आहे. सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी काम करणार आहे, असेही शृंगारे यांनी सांगितले.
Comments