लातूर : पावसाळ्याच्या दिवसात उजनी धरणात अतिरिक्त होवून वाहून जाणारे पाणी कृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या माध्यमातुन उजनी-जेवुर बोगदा-सीनाकोळेगाव-कुंथलगिरी मार्गे मांजरा नदीत व पुढे धनेगाव धरणात आणणे शक्य आहे. कमीत कमी खर्चात पूर्ण होणार्या योजनेतून उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यांची तहान भागेल शिवाय शेतीसाठीही त्याचा फायदा होणार आहे. शासनाने या योजनेबाबत विचार करुन तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी करणारा ठराव जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज देशमुख यांनी सर्वसाधारण सभेत मांडला. त्याला सर्वांनीच प्रतिसाद दिला.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके, समाजकल्याण सभापती संजय दोरवे, आरोग्य व बांधकाम सभापती प्रकाश देशमुख, पशूधन व कृषि सभापती बजरंग जाधव, महिला व बालकल्याण सभापती संगीता घुले, मुख्यकार्यकारी अधिकारी विपिन इटनकर, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी जोशी यांची प्रमुख उपस्थित होती़. तीन वर्षापुर्वी लातुर जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडला होता त्यावर्षी रेल्वेने पाणी आणुन लातुरकरांची तहान भागवावी लागली. त्यानंतर पुन्हा तिसया वर्षात या भागात दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. तीन वर्षापुर्वी उजनी धरणातुन लातुरला पाणी आणण्याबाबत चर्चा झाली मात्र पुढे त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. आता पुन्हा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे पाणी टंचाईवरील कायमस्वरुपी तोडग्याबाबत विचारविनिमय होवू लागला आहे. त्या अनुषंगाने गुरूवारी लातुर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उजनीचे पाणी लातुरला आणण्याबाबतचा ठराव मांडुन धीरज देशमुख यांनी हा विषय चर्चेत आणला आहे.
उजनी धरणात पावसाळ्यात अतिरिक्त होणारे पाणी जेवुन बोगद्यामार्गे सिना कोळेगाव प्रकल्पात आणता येईल तेथुन उपसा जलसिंचन योजनेद्वारे ते सोनारी मार्गे कुंथलगिरी येथे आणता येईल तेथुन ते मांजरा नदीत सोडता येईल. या पध्दतीने पावसाळ्यातच मांजरा धरण व सर्व बॅरेजेस भरुन घेता येतील. सध्या पाऊस अनियमित असल्यामुळे मांजरा धरण दोन-तीन वर्षातुन एकदाच भरते आहे. पश्चिम महाराष्ट्रात दरवर्षी निश्चित पाऊस पडत असल्यामुळे उजनी धरणातील अतिरिक्त पाणी आणुन मांजरा धरण भरुन घेता येईल. या योजनेवर सिना कोळेगाव ते कुंथलगिरी एवढीच पाईपलाईन टाकायची असल्यामुळे फक्त २०० ते ३०० कोटी रुपये खर्च होतील. या योजनेचा फक्त लातुर शहरच नव्हे तर मांजरा काठच्या उस्मानाबाद, बीड आणि लातूर जिल्ह्यातील गावांना आणि शेतकयांनाही या योजनेचा फायदा होणार आहे. राष्ट्रीय नदीजोड प्रकल्प म्हणुनही याकडे पहाता येईल आणि उस्मानाबाद, लातुर, बीड जिल्ह्यांतील लहान तलाव धरणे पावसाळ्यातच भरुन घेता येईल असे ठरावात नमूद करण्यात आले आहे. सदरील ठरावास भाजप गटनेते महेश पाटील यांनी अनुमोदन दिले असुन सत्ताधारी व विरोधी दोन्ही गटातील सदस्यांचे या ठरावावर एकमत झाले. शासनाने या ठरावाच्या अनुषंगाने कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
Comments