लातूर : आडातील गाळ काढताना विषारी वायूने गुदमरून मृत्यू झालेल्या आलमला येथील मुलाणी कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळवून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी दिले होते. या मदतीचे पत्र रमजान ईदच्या दिवशी मुलाणी कुटुंबियांना देण्यात आले. या माध्यमातून अभिमन्यू पवार यांनी दिलेला शब्द पाळला.
मार्च महिन्यात आलमला येथे ही दुर्घटना घडली होती. पाणीटंचाई असल्याने आडातील गाळ काढून तो स्वच्छ करण्याचे काम सुरू असताना फारुख खुदबुद्दीन मुलाणी, सद्दाम फारुख मुलाणी आणि सय्यद दाऊद मुलाणी या तिघांचा आडातील विषारी वायूने गुदमरून मृत्यू झाला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी आलमला येथे भेट देऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन त्यांनी पाळले आहे. आचारसंहिता संपताच त्यादृष्टीने कार्यवाही करून अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळवून दिला. आलमला येथे जाऊन मुलाणी कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे पत्र सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी सुभाष जाधव, संतोषअप्पा मुक्ता, गणेश कोलपाक यांचीही उपस्थिती होती.
Comments