HOME   लातूर न्यूज

धीरज देशमुख लाटतात भाजपाच्या कामाचे श्रेय!

शिवसेना, भाजपा सदस्यांचा आरोप, देशमुखांनी एकच काम सुचविल्याचा दावा


धीरज देशमुख लाटतात भाजपाच्या कामाचे श्रेय!

लातूर : लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजपा व शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांनी सुचवलेली कामे आपल्याच शिफारशीवरून करण्यात आल्याचे सांगत जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख यांनी मंजूर झालेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत जनतेची दिशाभूल केली आहे. हा प्रकार म्हणजे आयजीच्या जिवावर बायजी उदार असल्याचे सांगत आमच्या गटातील कामांची शिफारस करणारे देशमुख आहेत कोण? असा सवाल भाजपा व सेनेच्या सदस्यांनी उपस्थित केला आहे.
यासंदर्भात सदस्यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला कामे सुचवण्याचा अधिकार असतो. एसआरएफ अंतर्गत ही कामे केली जातात. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि अधिकारी कोणती कामे मंजूर करावी यासंदर्भात निर्णय घेतात. त्यानुसार ग्रामीण मतदारसंघातील भाजपाचे सदस्य सौ संगीत घुले, सुरेश लहाने, सुरेंद्र गोडभरले, सौ प्रीती शिंदे, मनिषा वाघमारे, सौ अरुणा शिंगडे व शिवसेनेच्या सदस्या सौ संगीता माने यांनी कामे सुचवली होती. सुरेंद्र गोडभरले यांनी खरोळा ते कुंभारवाडी तर सदस्या तथा महिला व बालकल्याण सभापती सौ. संगीताताई घुले यांनी टाकळगाव - घनसरगाव आणि फरदपूर - सेवानगर या रस्त्यांचे डांबरीकरण व मजबुतीकरण तसेच राज्य मार्ग २३२ ते दवणगाव कॉन्क्रीट रस्त्याचे काम करण्याची मागणी केली होती. सौ. प्रीती शिंदे यांनी येळी - जोडजवळा व मसला - पिंपरीअंबा या कामासाठी तर सेनेच्या सदस्या संगीता माने यांनी येल्लोरी - सिंदाळा (तालुका औसा ) या रस्ता कामाची शिफारस केली होती.
मागणी केलेली ही कामे मंजूर झाली. यापैकी अनेक कामे पूर्णही झाली. त्यानंतर आता जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख यांनी या कामांसाठी आपण शिफारशी केल्या होत्या. त्या शिफारशीवरूनच ही कामे मंजूर झाली असून यापैकी काही कामांना लवकरच प्रारंभ होणार आहे, अशा आशयाचे वृत्त विविध माध्यमातून जाणीवपूर्वक पसरवले जात आहे. ही जनतेची दिशाभूल असल्याचे भाजपा व सेनेच्या सदस्यांचे मत आहे. मुळात देशमुख हे जिल्हा परिषद सदस्य आहेत. ते आपल्या गटातील कामे सुचवू शकतात. किंवा इतर कामे सुचवली तरी त्याला मंजुरी देण्याचा अधिकार पदाधिकाऱ्यांचा असतो. असे असतानाही देशमुख यांनी आपण कामे केली असे सांगितले आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघातील कामांचे श्रेय घेणारे देशमुख हे काही पालकमंत्री किंवा या भागाचे आमदार नाहीत, असेही या पत्रकात म्हटले आहे.
धीरज देशमुख यांनी २० जून २०१६ रोजी अध्यक्षांना पत्र देऊन मौजे टाकळी शि. ते काळमाथा, मौजे चाटा ते बोपला, मौजे साखरा ते बार्शी रस्ता आणि मौजे शिऊर पाटी ते शिऊर रस्त्याची डांबरीकरणासह सुधारणा करण्याची मागणी केली होती. यापैकी एक काम मंजूर झाले आहे. त्यामुळे धीरज देशमुख यांनी आपण शिफारस केलेली कामे मंजूर झाल्यानंतर त्याचे श्रेय घ्यावे. भाजपा व सेनेच्या सदस्यांचे श्रेय घेऊन आपणच जनतेचे तारणहार असल्याचा भ्रम पसरवू नये, असा इशारा जि प सदस्य तथा सभापती सौ संगीता घुले, सुरेश लहाने, सुरेंद्र गोडभरले, सौ संगीता माने, सौ प्रीती शिंदे, मनीषा वाघमारे व सौ अरुणा शिंगडे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
कामे सुचवली नाहीत
जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख यांनी आपल्या कार्यकाळात कामाची शिफारस करण्यासाठी दिलेल्या पत्रावरून एक काम मंजूर झाले आहे. त्यांनी केवळ एकच पत्र दिले होते. त्या पत्रातील हे काम मंजूर आहे. लातूर ग्रामीण मधे तर त्यांनी काहीही काम केले नाही. असे असताना केवळ प्रसिद्धीसाठी हा खटाटोप केला जात असल्याचेही भाजपा सदस्यांनी म्हटले आहे.


Comments

Top