HOME   लातूर न्यूज

नळेगावचा जय जवान कारखाना पुन्हा चालू करा

बालाजी पाटील चाकूरकर यांचे पालकमंत्र्यांना साकडे


नळेगावचा जय जवान कारखाना पुन्हा चालू करा

लातूर: अवसायकाच्या ताब्यात असलेला चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील जय जवान जय किसान सहकारी साखर कारखाना चालू करण्यात यावा, अशी मागणी कारखाना वाचवा, शेतकरी व कामगार वाचवा समन्वय समितीचे मुख्य समन्वयक तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर यांनी एका निवेदनाद्वारे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडे केली आहे.
राज्याचे कामगार व कौशल्य विकास मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांची शनिवारी, १५ जून २०१९ रोजी सकाळी लातूर येथील निवासस्थानी भेट घेऊन बालाजी पाटील यांनी नळेगांव कारखाना चालू करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. या मागणीवर लवकरच योग्य निर्णय घेण्याबाबत सकारात्मक विचार करू, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी बालाजी
पाटील यांना दिले आहे. या निवेदनात बालाजी पाटील चाकूरकर यांनी पुढे असे नमूद केले आहे की, मागच्या साधारणतः साडे अकरा वर्षांपासून नळेगांव येथील जय जवान जय किसान सहकारी साखर कारखाना बंद पडलेला आहे. त्यामुळे या कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी, सभासद, कामगार, मजूर, लघु व्यावसायिक साधारणपणे १५ हजारांहून अधिक कुटुंबे म्हणजे किमान एक लाख लोकांच्या उदरनिर्वाहाचे हे साधन होते. कारखाना बंद अवस्थेत असल्याने याठिकाणचा शेतकरी, कामगार, व्यापार उध्वस्त झाला आहे. या कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी आजघडीला अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. कारण अन्य कारखाने शंभर चकरा मारल्यानंतर १५ - १६ महिन्यांनी ऊस घेऊन जातात. नेलेल्या ऊसाचे बील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यावर वेळेवर जमा होता नाही.ऊस चार - पाच महिने उशिरा नेल्याने त्याचे वजन कमी भरते व शेतकऱ्याचे नुकसान होते. आज ना उद्या हा कारखाना पूर्ववत चालू होईल या आशेवर मागच्या साडेअकरा वर्षांहून अधिक काळापासून कारखान्याचे कामगार दिवस कंठीत आहेत. आजघडीला हा कारखाना महाराष्ट्र राज्य शिखर बँकेच्या, एमएससी बँकेच्या ताब्यात आहे. साधारणतः ३०० एकर जमिनीवर उभारण्यात आलेल्या या कारखान्याची मशिनरी चांगल्या स्थितीत असल्याचा अहवाल केंद्रीय पथकाने केलेल्या
पाहणीनंतर दिला आहे. तसेच या कारखाना कार्यक्षेत्रात आजही किमान चार लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. एवढेच नव्हे तर गाळप हंगामासाठी लागणारे पाणीही उपलब्ध आहे. केवळ त्याकाळातील संचालकांच्या खाऊगिरी वृत्तीमुळे हा कारखाना बंद पाडला गेला आहे. राज्यातील अनेक सहकारी साखर कारखान्यांची अवस्था अशीच आहे. त्यामुळे राज्यातील बुडीत निघालेली सहकारी साखर कारखानदारी वाचविण्यासाठी एक अभ्यास गट तयार करून या सहकारी साखर कारखानदारी चळवळीला ऊर्जा देण्याचे काम करावे अशी मागणीही बालाजी पाटील
यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रति त्यांनी मुख्यमंत्री, सहकार मंत्री यांनाही पाठविल्या आहेत.


Comments

Top