लातूर-मुंबई: रेल्वेच्या पाण्याचा अनुभव झाल्यानंतर वॉटरग्रीडचे स्वप्न दाखवने जात आहे. चार वर्षापासून तहानलेल्या लातूरकरांना आता निवणूका डोळयासमोर ठेवून होणारी घोषणाबाजी नको असून प्रत्यक्ष पाणी हवे असल्याचे माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी आज विधानसभेत ठणकावून सांगीतले. मुंबई येथे सुरू असलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी प्रश्नोत्तरांच्या तासात अमित देशमुख यांनी लातूरचा पाणी प्रश्न उपस्थित केला.
यावेळी आमदार देशमुख म्हणाले की, पाण्याची तीव्र टंचाई असणाऱ्या लातूरकरांनी चार वर्षापूर्वी रेल्वेचा पाणीपुरवठा अनुभवला. आता सरकार वॉटरग्रीड विषयी बोलत आहे. तेव्हा दुष्काळग्रस्त लातूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्रयांनी लातूरला नियमित पाणीपुरवठा होईल असे आश्वासन दिले होते. मात्र आजही लातूरकरांना महिन्यातून केवळ दोनवेळाच पाणी मिळत आहे.
उजनीच्या पाण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे मौन
अमृत योजनेअंतर्गत लातूर शहरात जलवाहिन्या टाकण्याचे काम १८ महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते परंतु तीन वर्षानंतरही ते काम गोगलगायीच्या गतीने सुरु आहे. अद्यापही या जलवाहिन्या नळांशी जोडण्यात आलेल्या नाहीत ही कैफियत आमदार देशमुख यांनी सभागृहात मांडली असता, अमृत योजनेचे हे काम महिनाभरात पूर्ण होईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. वॉटरग्रीडमार्फत देण्यात येणारे पाणी ग्रामपंचायत पातळीवर देण्यात येईल का? हा प्रश्नही आमदार अमित देशमुख यांनी यावेळी उपस्थित केला आणि मुख्यमंत्र्यांकडून या प्रश्नावर होकारार्थी उत्तर मिळविले. उजनीच्या पाण्याबाबत मात्र त्यांनी मौन बाळगले. वॉटरग्रीड संकल्पनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हावी आणि ही केवळ निवडणूक घोषणा होऊ नये याकडेही आमदार अमित देशमुख यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
Comments