HOME   लातूर न्यूज

पुनर्विवाह परिचय मेळावा हे क्रांतिकारी पाऊल : डॉ. वाडकर

वीरशैव लिंगायत समाजाच्या पुनर्विवाह वधू-वर परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद


पुनर्विवाह परिचय मेळावा हे क्रांतिकारी पाऊल : डॉ. वाडकर

लातूर : येथील वीरशैव लिंगायत समाज लातूरच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यातील पहिल्या सामाजिक पुनर्विवाह परिचय मेळाव्याला महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यातील वधू-वरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. १५० वर वधू-वरांनी प्रत्यक्ष उपस्थिती लावली, तर दोनशेवर इच्छुकांनी आपली नोंदणी केली. मेळाव्याच्या प्रारंभी डॉ. प्रभा वाडकर यांनी समाजात सध्या विविध कारणांनी विभक्त होणाऱ्या जोडप्यांची संख्या वाढत आहे. मात्र अशांचे विवाह जुळविताना बऱ्याच अडचणींना पालकांना सामोरे जावे लागते. अशावेळी वीरशैव लिंगायत समाजाने अशा दुर्लक्षित घटकांसाठी हा मेळावा आयोजित करणे, हे क्रांतिकारी पाऊल असल्याचे मत व्यक्त केले.
लातूर शहरातील वीरशैव सांस्कृतिक भवनात हा मेळावा पार पडला. यावेळी ॲड. जयश्रीताई पाटील, डॉ. वर्षा दरडे, डॉ. प्रभा वाडकर, विश्वनाथप्पा निगुडगे, दत्तात्रय पत्रावळे, बाबासाहेब कोरे, मेळाव्याचे मुख्य संयोजक विवेक जानते, निमंत्रक उमाकांत कोरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेला वंदन करून मेळाव्यास प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विवेक जानते यांनी आयोजनामागचा हेतू स्पष्ट केला. राज्यासह शेजारच्या कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातूनही इच्छुकांनी प्रत्यक्ष व अन्य मार्गाने नोंदणी करत मोठा प्रतिसाद दिल्याची माहितीही जानते यांनी दिली. तसेच मेळावा ही तर सुरुवात असून, ही निरंतर सुरू राहणारी प्रक्रिया असल्याचे सांगितले. मेळाव्याची कसलीही पुस्तिका नाही, तर प्रत्येक वधू-वराला पूरक अशी स्थळे सुचविली जाणार असल्याचे सांगितले. निमंत्रक उमाकांत कोरे यांनी, सामाजिक जाणिवेतून हा मेळावा घेत असल्याचे सांगून समाजातील सर्वांनी मतभेद विसरून संघटित व्हावे आणि हे कार्य आणखी पुढे न्यावे, असे आवाहन केले. मेळाव्यात विविध विषयांवर उपस्थित वधू-वरांना मार्गदर्शन करण्यात आले. यात प्रा. दत्तात्रय पत्रावळे यांनी, नैराश्यातून अनेक विपरित घटना घडतात. यातून बाहेर पडण्यासाठी अपेक्षा कमी ठेवणे अधिक उत्तम असल्याचे सांगितले. तसेच जबाबदाऱ्या अधिक घ्याव्यात आणि अपेक्षा कमी, हे आनंदी जीवनाचे सूत्र असल्याचे सांगितले. ॲड. जयश्री पाटील यांनी कायदेविषयक बाबींवर मार्गदर्शन करताना पुनर्विवाह करताना काय कायदेविषयक काळजी घ्यावी., कोणत्या बाबी तपासाव्यात याची माहिती दिली. डॉ. वर्षा दरडे यांनी आरोग्याविषयक बाबींवर मार्गदर्शन करताना, वैद्यकीयदृष्ट्या योग्य असूनही अविवाहित आयुष्य जगावे लागणे, हे समाजासाठी अयोग्य असल्याचे सांगितले. आज वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनांमुळे आरोग्याच्या प्रत्येक समस्येवर उपचार शक्य आहे. त्यामुळे केवळ एखाद्या आजारामुळे लग्न न करणे चुकीचे ठरेल, असेही डॉ. दरडे म्हणाल्या. वीरशैव लिंगायत समाजाने पूर्णपणे मोफत स्वरूपाने आयोजित केलेल्या या मेळाव्याच्या यशस्वितेसाठी सिद्रामप्पा पोपडे, रामदास भोसले, बालाजी पिंपळे, उमेश कामशेट्टी, काशिनाथ भरडे, चंद्रकांतअप्पा राचट्टे, महेश जवळे, व्यंकट अक्कनवरू, दत्ता लोखंडे, प्रशांत बोळेगावकर, बंडाप्पा जवळे, उमाशंकर नागुरे, शिवाजी चिलबीले, उदय चौंडा, पंकज कोरे, डॉ. उर्मिला धाराशिवे, सौ. ज्योती मंगलगे यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले.


Comments

Top