लातूर: शेतकऱ्यांना तंत्रज्ञान वापराचे स्वातंत्र्य मिळावे आणि जीएम व एचटीबीटी बियाणांवरील बंदी तात्काळ उठवून ते बाजारात उपलब्ध करावे या मागणीसाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने औसा तालुक्यातील हिप्परसोगा येथे सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आले. जीएम व एचटीबीटी बियाणाची लागवड करण्यात आली. जीएम व एचटीबीटी बियाणाच्या लागवडीला सरकार परवानगी देत नाही. प्रगत देशात हे बियाणे वापरण्यास परवानगी आहे. त्यामुळे तेथे हे बियाणे वापरले जाते. आपल्या देशात मात्र शेतकऱ्यांना कायदा मोडून, चोरून या बियाणांचा वापर करावा लागतो. स्वातंत्र्यानंतरही देशात शेतकऱ्यांना न्याय्य मागण्यांचा हक्क नाकारण्यात आला आहे. शेतकऱ्यांचा संकोच करणारे कायदे तयार करण्यात आले आहेत. घटनेतील अनुच्छेद १९ (१) f ,१९ (१)g ,२१, ३१ ,३९१ नुसार कोणत्याही व्यावसायिकाला व्यवसाय स्वातंत्र्य बहाल करण्यात आले होते. त्यात शेती व्यवसायाचाही समावेश होता. पण नंतर घटनादुरुस्ती करण्यात आली. राज्यघटनेत अनुसुची ३१ - ब तयार करण्यात आले त्या अंतर्गत परिशिष्ट ९ जोडले गेले. या परिशिष्टातील २५० कायदे शेतकऱ्यांचा संकोच करणारे आहेत. जमीन धारण कायदा, आवश्यक वस्तूंचा कायदा असे जाचक कायदे तयार करून शेतकऱ्यांना गुलाम बनवण्यात आले आहे. सरकारच्या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांना जगणे कठीण झाले आहे.
सरकारने शेती व्यवसायातील लुडबुड थांबवावी ,तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळावे, जीएम व एचटीबीटी बियाणांवरील बंदी उठवावी या प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी औसा तालुक्यातील हिप्परसोगा येथे हे आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.
संघटनेचे नेते अनंत देशपांडे, माधव मल्लेशे, माजी जिल्हा प्रमुख शिवाजी पाटील नदीवाडीकर, माधव कंदे, जिल्हा प्रमुख मदन सोमवंशी, युवा जिल्हा प्रमुख रुपेश शंके, दगडूसाहेब पडिले, बालाजी जाधव, बाबाराव पाटील, हरिश्चंद्र सलगरे, किशनराव शिंदे, अशोक पाटील, कालिदास भंडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलनाचा दुसरा टप्पा मंगळवारी बोरी येथे तर बुधवारी अहमदपूर तालुक्यातील रुई दक्षिण येथे राबवण्यात येणार असल्याची माहितीही संघटनेच्या वतीने देण्यात आली.
Comments