लातूर: काल दुपारी लातूर शहरात झालेल्या पावसाने प्रभाग ०५ मधील सम्राट चौक, मोची गल्ली, वडारवाडा व इतर परिसरात नाल्या तुंबल्याने पाणी दुकाने व घरांमध्ये घुसून नागरिकांचे मोठे नुकसान झाले. वेळीच योग्य कचरा व्यवस्थापन व नाले सफाई न केल्यामुळे हा प्रसंग उद्भवला असून कंत्राटदार व सत्ताधाऱ्यांच्या अकार्यक्षमतेचा फटका प्रभागातील नागरिकांना बसला आहे. झालेले नुकसान पाहता मनपाने नुकसान भरपाई द्यावी व नुकसान भरपाईची रक्कम पदाधिकारी व कंत्राटदाराकडून वसूल करावी अशी मागणी नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी केली.
प्रभाग ०५ मध्ये येणाऱ्या सम्राट चौक भागामध्ये गंजगोलाई परिसरातील हनुमान चौक ते शाहू चौक या भागातील सांडपाणी वाहत येऊन नाल्याला मिळते. त्यासह या भागातील मोठ्या प्रमाणात जमा होणारा कचरा विशेषतः प्लास्टिकचा कचरा पाहून येतो व नाल्या तुंबण्याचे प्रकार घडतात. याकरिता आवश्यक असणारी मान्सून पूर्व नालेसफाई करण्यात आली नाही. प्लास्टिकवर म्हणावे तेवढे निर्बंध टाकण्यात मनपा यशस्वी ठरलेली आहे. हा भाग महापौरांच्या प्रभागात असूनही कचरा व्यवस्थापनाकडे त्यांचे सपशेल दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. लातूर शहराचे कचरा व्यवस्थापन कंत्राटदार जनाधार सेवाभावी संस्था या संस्थेचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असून शहरामध्ये जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येत आहेत. शेजारील प्रभागातील अनियमित घंटागाड्या व अनियोजित घनकचरा व्यवस्थापनाचा भार हा प्रभागावर येऊन नाल्यांचे पाणी दुकाने व घरात घुसून नागरिकांना प्रचंड मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे असे विक्रांत गोजमगुंडे यांचे म्हणणे आहे. परंतु अशा परिस्थितीही प्रभाग ०५ चे स्वच्छता निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी कार्यतत्परता दाखवित नाल्या खुल्या करण्याचे काम हाती घेतले, काही ठिकाणी ब्रेकरच्या साहाय्याने नाल्या फोडून काढाव्या लागल्या. सक्शन पंपाद्वारे पाणी काढण्यात आले. टाकाऊ प्लास्टिकमुळे पाण्याचा विसर्ग होण्यास अडचण होत होती. काल सुरू झालेले काम सलग २४ तासापासून अविरत सुरू होते. याकामी अथक परिश्रम घेणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार नागरिकांच्या वतीने करण्यात आला.
Comments