लातूर: लातूर येथील जेष्ठ फिजिशीयन डॉ. ईश्वर राठोड यांचे आज दुपारी ०३ वाजता निधन झाले. काही दिवसापासून ते आजारी होते. दुरुस्त झाल्यानंतर त्यांनी पुन्हा प्रॅक्टिस सुरु केली होती. पण मागच्या काही दिवसापूर्वी त्यांची तब्येत खालावली. एक मनमिळाऊ, नम्र, माणुसकीचा डॉक्टर म्हणून त्यांची जनसामान्यात ओळख होती. लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील हजारो रुग्णांना त्यांनी जीवदान दिले होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी मीना राठोड, मुलगा डॉ. मेहुल राठोड व सून डॉ प्रियंका राठोड असा परिवार आहे. मारवाडी स्मशानभूमी येथे डॉ. राठोड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सृजनशील, शिस्तबध्द आणि निष्णात डॉ. ईश्वर राठोड- आ. अमित देशमुख
सृजनशील, शिस्तबध्द आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित असलेले राज्यातील नामवंत हृदयरोग आणि मधूमेह तज्ज्ञ डॉ. ईश्वर राठोड यांच्या निधनाचे वृत समजून मनस्वी दुख: झाले आहे, असे माजी राज्यमंत्री, आमदार अमित देशमुख यांनी म्हटले आहे. या संदर्भाने प्रसिध्दीस दिलेल्या शोकसंदेशात आमदार देशमुख यांनी म्हटले आहे की, लातूरच्या वैद्यकीय क्षेत्रात तत्वाला धरुन वैद्यकिय व्यवसाय करण्याचा पायंडा निर्माण करणाऱ्या डॉ.राठोड यांनी येथे अल्पावधीतच नावलौकिक मिळवला होता. एम. जे. हॉस्पिटल, येथे हृदयरोग, मधूमेह, अर्धांगवायू यासारख्या गंभीर आजाराचे निदान व उपचार त्यांनी केले. अद्ययावत तंत्रज्ञान उभारून त्यांनी लाखो रुग्णांवर यशस्वी उपचार केलेले आहेत. आपल्या रूग्णसेवूतून वैद्यकीय क्षेत्रात लातूरचा नावलौकिक वाढवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा राहिला आहे. डॉ. ईश्वर राठोड यांचे देशमुख कुटुंबियाशीही अत्यंत स्नेहाचे संबंध होते. राठोड कुटुंबियांच्या दुखात मी व माझे कुटूंबीय सहभागी आहोत. या दु:खातुन सावरण्याची शक्ती त्यांना मिळो ही अशी प्रार्थना आमदार अमित देशमुख यांनी केली आहे.
Comments