निलंगा : देवणी तालुक्यातील धनेगाव येथील बॅरेजच्या बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांचा अनेक दिवसांपासुन अडकलेला मावेजा मंजुर झाला आहे. पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी पाठपुरावा केल्यामुळे ५१ कोटी ४४ लाख ८७ हजार रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला असून आता या बॅरेजमधे पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करता येणार आहे. यामुळे पाच गावांचा पाणी प्रश्न सुटणार असून ०२ हजार हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे.
मांजरा नदीवर धनेगाव येथे बॅरेज बांधण्यात आले आहे. त्यासाठी ३६३ शेतकऱ्यांची २१२.८१ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. पण तत्कालीन राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे या शेतकऱ्यांना केवळ ९.५५ कोटी वाटप करण्यात आले. उर्वरित मावेजा देण्यात आला नाही. हा मावेजा मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी सतत पाठपुरावा केला होता. शिवाय मावेजा मिळत नसल्याने पूर्ण क्षमतेने पाणी साठवण्यास शेतकऱ्यांचा विरोध होता. पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी या प्रश्नात घालून तो तात्काळ सोडवला. त्यामुळे निधी वर्ग करण्यात आला आहे. दोन दिवसात पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. शेतकऱ्यांचा मावेजा मिळाल्यामुळे यावर्षी बॅरेजमधे ८.०५ मीटर या पूर्व क्षमतेने पाणीसाठा करता येणे शक्य आहे. प्रकल्पात पाणी साठल्याने ०२ हजार हेक्टर जमिनीला सिंचनासाठी पाणी मिळणार आहे. यासोबतच धनेगाव, शिऊर, गिरकचाळ, हेळंब व होळसांगवी या गावांचा पाणीप्रश्न सुटणार आहे. अनेक वर्षापासुन प्रलंबित असणारा प्रश्न सोडविल्याबद्दल धनेगाव व परिसरातील शेतकरी व नागरिकांनी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे आभार मानले आहेत.
Comments