HOME   लातूर न्यूज

निराधार संघर्ष समितीच्या मोर्चाला जनसागर लोटला

औशाच्या तहसीलदारांना दिले निवेदन, मानधन वाढवण्याची मागणी


निराधार संघर्ष समितीच्या मोर्चाला जनसागर लोटला

औसा : निराधारांना महिना तीन हजार रुपये मानधन द्यावे, दारिद्र्यरेषेची अट रद्द करावी यासह विविध मागण्यांसाठी निराधार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्यच्या वतीने औसा येथे काढण्यात आलेल्या महामोर्चाला जनसागर लोटला. जवळपास सात ते आठ हजार निराधार, अपंगांनी सहभागी होत तहसीलदारांना निवेदन दिले. निराधारांना महिना तीन हजार रुपये मानधन द्यावे, मानधन मिळण्यासाठी असणारी दारिद्ररेषेची अट रद्द करावी, शेतकऱ्यांनाही महिना तीन हजार रुपये मानधन द्यावे, अपंगत्वासाठीचे वैद्यकीय प्रमाणपत्र तालुकास्तरावर देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लातूर व उस्मानाबाद जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र मोरे व राजीव कसबे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. औसा येथील किल्ला मैदानापासून मोर्चाला प्रारंभ झाला. यात वृद्ध, निराधार, अपंग यांनी हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदवला. घोषणा देत हा मोर्चा दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चाच्या वतीने शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
या मोर्चामध्ये निराधार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष राजेंद्र मोरे, मार्गदर्शक अस्लमखां पठाण, अंकुश कांबळे, संयोजक राजीव कसबे यांच्यासह रुपेश शंके, शाम जाधव, सुरेश भोसले, दयानंद निकम, अभयसिंग बिसेन, राम कांबळे, दिलीप सातपुते, संपत गायकवाड, मुनीदास माने, सचिन कांबळे, कृष्णा लोंढे, रोहिदास हजारे, गोविंद शिंदे, शिवाजी साठे, सोपान भिसे, साहेब जगताप, नेताजी कांबळे, नामदेव रसाळ, सुरजपाशा अन्सारी, उमाशंकर हजारे, याकुब शेख, मारुती मस्के,महादेव वाघमारे, विठ्ठल संपते, दगडूसाहेब पडिले, धनराज कांबळे यांच्यासह हजारो अपंग, निराधार व वृद्धांनी सहभाग घेतला.


Comments

Top