लातूर : वसुंधरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्हाभरात वृक्ष लागवड, संवर्धन आणि जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यावर्षी बक्षीस योजनेच्या माध्यमातून विविध गावांत ११ हजार झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. शिवाय मागच्या चार वर्षांपासून लावलेल्या झाडांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
वसुंधरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या साडेचार वर्षांपासून लातूर जिल्ह्यात वृक्षांची चळवळ मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. या दरम्यान अनेक उपक्रम राबवून नागरिकांना या कार्यासाठी प्रेरित करण्यात आले आहे. एक विद्यार्थी: एक वृक्ष, एक गणेश मंडळ : अकरा वृक्ष, झाडांचा वाढदिवस, मोफत हेल्पलाईन, झाडांचे वाढदिवस, ट्री बँक, निसर्गाशी मैत्री अभियान, श्रमदानातून वृक्षारोपण, एक व्यक्ती: एक वृक्ष, एक घर: दोन झाडं, वृक्ष संवर्धनासाठी बक्षीस योजना असे नानाविध प्रकारचे अभिनव उपक्रम राबविण्यात आले आणि यशस्वी करण्यात आले. यावर्षी ग्रामीण भागात वृक्षारोपण आणि संवर्धनसाठी रोख रक्कम ५५,५५५ रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले असून या बक्षीस योजनेच्या माध्यमातून ११ हजार झाडांची लागवड आणि संगोपन केले जाणार आहे. या दरम्यान गत चार वर्षांपासून विविध ठिकाणी लागवड करण्यात आलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करून वृक्ष संवर्धन काळाची गरज याचे महत्त्व पटवून दिले जात आहे. विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपण आणि संगोपन बाबत जनजागृती केली जात आहे.
०२ जुलै रोजी भुसणी गावात झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. शिवाय, नव्याने काही झाडंही लावण्यात आली. झाडांची लागवड करताना पर्यावरण पूरक झाडे निवडली जात असून यात प्रामुख्याने वड, पिंपळ, कडुनिंब, कदंब, बकुळ, अर्जुन, हेळा, चिंच आदी झाडांचा समावेश आहे. ०२ जुलै रोजी पार पडलेल्या उपक्रमात शाळेतील शिक्षक हेंगणे, सय्यद, राजमाने, दळवे, लुल्ले, कांबळे, शुभम स्वामी, रामराजे काळे, लक्ष्मण काळे, शिवम वांगजे, वसुंधरा प्रतिष्ठानचे लातूर शहर कार्याध्यक्ष अमोल स्वामी, सदस्य प्रशांत स्वामी यांनी सहभाग नोंदवून श्रमदान केले.
Comments