लातूर: पेरणीचा कालावधी संपत आला तरी पावसाअभावी जिल्ह्याच्या बहुतांश भागात पेरण्या झालेल्या नाहीत. यामुळे शेतकरी अडचणीत आला असून सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत म्हणून द्यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लातूर व उस्मानाबाद जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र मोरे यांनी केली आहे.
जुलै महिना अर्धा झाला तरी अद्याप लातूर जिल्ह्याच्या बहुतांश भागात पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. अत्यल्प पावसावर जिल्ह्यातील ०५ टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. पण पावसाअभावी पेरलेले बियाणे उगवण्याची खात्री नाही. जिल्ह्यातील बहुतांश जनता शेतीवरच अवलंबून आहे. पेरणीसाठी उधार-उसनवारी करत शेतकऱ्यांनी तयारी केली होती. पण पाऊस न पडल्याने खरिपाचा हंगाम हातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच पेरणीसाठी घेतलेले कर्ज डोक्यावर राहणार आहे. आता पाऊस झाला आणि पेरणी केली तरी पिकाला उतार येणार नाही.
मागच्या दोन वर्षात जिल्ह्यात कायम दुष्काळी स्थिती आहे. अशा स्थितीत शेतकरी पूर्णपणे कंगाल झाला आहे. जवळची पुंजी संपल्याने आणि खरीप हंगामात काहीही हाती लागणार नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अशावेळी राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी राजेंद्र मोरे यांनी केली आहे.
Comments