लातूर: शांत आणि सुरक्षित जिल्हा म्हणून ओळख असलेल्या लातूर जिल्हयात अलीकडच्या काळात गुन्हेगारीच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. ती रोखण्यासाठी पोलीस विभागाने जलद गतीने काय्रवाही करावी व गुन्हेगारांना जरब बसवावी जेणे करून या जिल्हयाचा कायदा सुव्यवस्थेचा लौकीक कायम राहील, अशी सुचनावजा मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सचिव माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी लातूर जिल्हयाचे पोलीस अधिक्षक राजेंद्र माने यांची भेट घेवून केली आहे.
भारतीय काँग्रेस कमिटी सचिव माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सोमवार सोमवार दि. १५ जुलै रोजी माजी आमदार वैजनाथ शिंदे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड.व्यकंट बेद्रे, जगदिश बावणे, ॲड. किरण जाधव व जिल्हयातील पदाधिकारी शिष्टमंडळासह जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र माने यांच्या कार्यालयात जावून त्यांची भेट घेतली व जिल्हयातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठीच्या मागणीचे सविस्तर निवेदन त्यांना दिले. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षका सोबत झालेल्या चर्चेत व निवेदनात आमदार देशमुख यांनी म्हटले आहे की, मराठवाडा विभागात अत्यंत वेगाने विकसीत होत असलेल्या आणि शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपाला आलेल्या लातूरचा शांत आणि सुरक्षित जिल्हा म्हणून लौकीक निर्माण झालेला आहे. परंतु अलीकडच्या काळात लातूर शहर आणि संपूर्ण जिल्हयातच गुन्हेगारीच्या घटनामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामूळे नागरिकांच्या तसेच विदयार्थ्यांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण होत आहे. यातून जिल्हयाच्या लौकीकाला धक्का पोहचत आहे. लातूर जिल्हयात पूर्वी खुन, दरोडे अशा घटना अपवादानेच घडत असत परंतु सदया अशा गुन्हयाच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निर्दशनास येत आहे, आणि गुन्हयाच्या तपासात फारशी प्रगतीही दिसत नाही. परिणामी गुन्हेगाराचे मनोबल वाढून आणखी गुन्हयाची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातून नागरिकांच्या मनात भिती निर्माण होवून त्याचा थेट परिणाम जिल्हयाच्या विकासावर होत आहे. जिल्हात मटका, अवैध दारूवीक्री, गुटखा विक्री, वाळू व गौणखनीज तस्करी, घरफोडया, रस्त्यावर महिलांचे दागीणे पळविण्याचे प्रकार राजरोसपणे वाढले आहेत. यातील काही गुन्हयांना, अपप्रकारांना राजश्रय मिळत असल्याच्या तक्रारी येत आहेत यातून पून्हा हप्तेखोरी आणि लाचखोरीचे प्रकार वाढत आहेत. लातूर जिल्हा या सर्व प्रकारापासून पूर्वी दूर होता त्यामूळेच येथील शेती, उदयोग, व्यापार, शिक्षण या क्षेत्रात पूढे होता परंतु आता यासर्वच क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम होत आहे. या सर्व अवैध आणि गुन्हेगारी प्रकाराला प्रतिबंध घालण्यासाठी आपण स्वत:हा लक्ष घालून निपक्षपाती आणि कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. गुन्हेगारी पृवत्तीच्या लोकांना जरब बसविण्यासाठी आपण तातडीने कार्यवाही कराल ही अपेक्षा आहे असेही आमदार देशमुख यांनी निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे. यावेळी लातूर ग्रामीणच्या उपअधिक्षक प्रिया पाटील, पोलीस निरीक्षक नंदकूमार पाटील तसेच पदाधिकारी दगडूसाहेब पडीले, रघुनाथ बनसोडे, जितेद्र स्वामी, पंडीत ढमाले, आदी उपस्थित होते.
Comments