लातूर: मानवी हस्तक्षेप टाळून उच्च तंत्रज्ञानावर आधारित रिडरमुक्त वीज मीटर वाचन प्रणाली आणण्यासाठी आरएफ मिटर बसविण्यात येत आहेत. परंतु, या ना त्या कारणाने आणि कांही गैरसमजातून ग्राहकांत या मीटरबाबत संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे मोर्चे, आंदोलने आणि बंदचे आवाहन करण्यात येत आहे. असे असहकार आंदोलने करण्याऐवजी नागरिकांनी वीज बिलींग व्यवस्था समजून घेत महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन मुख्य अभियंता आर. आर. कांबळे यांनी केले. तसेच त्यांनी नागरिकांच्या वीज बिलासंबंधी असणाऱ्या तक्रारी सोडविण्यासाठी त्या- त्या भागातील लोकप्रतिनिधी आणि प्रतिष्ठीत नागरिकांना विश्वासात घेवून तात्काळ ग्राहक मेळावे घ्यावेत अशा सूचना दिल्या.
याचाच भाग म्हणून महावितरण शाखा कार्यालय तीन (आर्वी उपकेंद्र) येथे ग्राहक तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. तर शाखा कार्यालय एक अंतर्गत उत्त्र उपविभागीय कार्यालय परिसरात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास त्या त्या भागातील नगरसेवक, सामाजिक संघटना प्रतिनिधीनी उपस्थित राहवे असे आवाहन करण्यात आले आहे.
शिवाय, मागील काळात वीज मिटर बदली प्रक्रियेत ज्या ग्राहकांना सरासरी वीज बिले प्राप्त झाली आहेत. अशा ग्राहकांनी केंव्हाही संबंधित शाखा कार्यालये अथवा संबंधित उपविभागीय कार्यालयात आपल्या तक्रारी दाखल कराव्यात असे आवाहन मुख्य अभियंता आर. आर. कांबळे यानी केले आहे. विजेसंबंधीच्या कोणत्याही तक्रारीसाठी महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्रातील 18002333435, 18001023435 व 1912 आणि स्थानिक संपर्कासाठी डीएसएस कंट्रोल रुमला 7875762021 संपर्क साधावा असेही मुख्य अभियंत्यांनी कळविले आहे.
Comments