HOME   लातूर न्यूज

संजय बनसोडे यांच्या घरी चोरी: दोन गुन्हेगारांना अटक

सोने विकल्याचे मान्य, १७ तोळे जप्त, आरोपी बुलढाणा जिल्ह्याचे


संजय बनसोडे यांच्या घरी चोरी: दोन गुन्हेगारांना अटक

लातूरः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय बनसोडे यांच्या घरी दुपारी चोरी करून रोख रक्कम व दागिने लंपास केल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हेगाराला अटक केली असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, आंबाजोगाई रोड येथे रहात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय बनसोडे यांच्या घरी भर दुपारी चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा जवळपास साडेसात लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी शिल्पा संजय बनसोडे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधिक्षक डॉ. राजेंद्र माने, अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक कामाला लागले. गुन्हे करण्याची पध्दत पहाता पोलीसांनी राज्यात सर्वत्र शोध सुरू केला. या पथकाने तपास केल्यानंतर हा गुन्हा राजू उर्फ शिवानंद पवार व त्याच्या साथीदाराने केल्याचे उघड झाले. पोलीसांनी अधिक तपास करून सिंधखेड राजा तालुक्यातील दुसरबीड येथे जावून एका विधी संघर्ष बालकास ताब्यात घेतले. त्या बालकाने राजू पवार याच्यासोबत गुन्हा केल्याचे कबूल केले. या बालकाकडून एक गाडी जप्त करण्यात आली आहे. पोलीसांनी अधिक तपास करून वाशिम पोलीसांच्या मदतीने वाशिम व बुलढाना जिल्ह्याच्या सिमेवर वास्तव्यास असलेल्या राजू पवार यास सापळा लावून पकडण्यात आले. यावेळी त्याने सावत्र भावाच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे मान्य केले. तसेच देऊळगाव राजा येथे एका सोनाराकडे सोने विकल्याचे मान्य केले. सुवर्णकार विष्णू भुतेकर याच्याकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी १७ तोळे सोने जप्त करण्यात आले असून सध्या दोन्ही आरोपी लातूर पोलीसांच्या ताब्यात आहेत. तसेच सुवर्णकार भुतेकर यांच्याकडून पोलीसांनी मुद्देमाल जप्त केला असून राजू पवार याने या अगोदर घरफोड्या व मोटारसायकली चोरल्याचे सांगण्यात आले.
गुन्हेगारांना अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल नागरगोजे, त्यांच्या पथकातील सुनिल रेजीतवाड उपनिरीक्षक राम गवारे, युसूफ शेख, सदानंद योगी, राजेश कंचे, रियाज सौदागर, राजाभाऊ मस्के, सचिन मुंडे, नागनाथ जांभळे, दिनकर गोरे, भगवान गावंडे, प्रशांत राजगुरू यांच्यासह कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. या गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कल्याण नेहरकर करित आहेत.


Comments

Top