लातूर: वडिलांच्या पुण्यतिथीवर होणाऱ्या खर्चात बचत करून ती रक्कम सांगली व कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या रूपात देण्याचा संकल्प येथील युवा उद्योजक अजय बोराडे पाटील यांनी केला असून या अंतर्गत सुमारे एक लाख रुपयांचे साहित्य त्यांनी खरेदी केले आहे. लवकरच ते गरजूंना वितरित केले जाणार आहे. येथील नेटिझन्स मीडियाचे प्रमुख अजय बोराडे पाटील यांचा विधायक कामात सतत सहभाग व पुढाकार असतो. समाजसेवेचा हा वसा वारसा त्यांना त्यांचे वडील प्रकशरावांकडून मिळाला. गतवर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. या वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांची पुण्यतिथी आहे. दरम्यान सांगली व कोल्हापूर येथील पुराने विस्कळीत केलेले जनजीवन पाहून अजय व त्यांच्या परिवाराने हा निर्णय घेतला. गरीब व गरजूंना मदत करणे हा मानवधर्म असून हीच खरी परमेश्वराची पूजाही आहे, ही त्यांच्या वडिलांची शिकवण अजयना आठवली व पुण्यतिथीवरचा खर्च कमी करून ती रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वापरावी असे त्यांना वाटले. ही भावना त्यांनी त्यांच्या आई जनाबाई व पत्नी रूपाली तसेच मित्र नितीन तुकाराम गुढे यांना बोलून दाखवली व सर्वांनी त्यास होकार भरला. नितीन यांनी त्यांच्या वतीने औषधे दिली. अजय यांनी साहित्य खरेदी केले. यात चादरी, साबण, टूथब्रश, कंगवे, बँडेज, तांदूळ, गहू, खाद्यतेल, बिस्किटे, पाण्याच्या बाटल्या आदींचा समावेश आहे.
खाऊच्या पैशातून मदत
अजय यांचा मुलगा अवनीश याने जमा केलेले खाऊचे अकरा हजार रुपये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लातूर जिल्हा अधिकारी जी. श्रीकांत यांना सुपूर्त केले.
Comments