लातूर: राज्यातील महिला बचत गटांना शासनाकडून शून्य टक्के व्याजदराने भांडवल उपलब्ध करून दिले जात आहे. यापुढील काळात बचत गटांना मोठ्या प्रमाणावर वाढीव खेळते भांडवल उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही अन्न व नागरी पुरवठा, कौशल्य विकास व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.
ग्राम विकास विभाग व लातूर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिरकणी महोत्सव सन 2019-20 अंतर्गत जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री स्टॉलच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. यावेळी खासदार सुधाकर शृंगारे, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातुरे, महापौर सुरेश पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन इटनकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती संजय दोरवे, कृषी सभापती बजरंग जाधव, महिला व बालकल्याण सभापती संगीता घुले, अहमदपूर पंचायत समितीच्या सभापती आयोध्याताई केंद्रे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर भातलवंडे, जिल्हास्तरीय व्यवस्थापक देवकुमार कांबळे यांच्यासह इतर पदाधिकारी अधिकारी व महिला बचत गटांच्या सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी हक्काची बाजारपेठ मिळावी म्हणून लातूर मुख्यालयाच्या ठिकाणी अशी बाजारपेठ निर्माण करणार असल्याचे पालकमंत्री निलंगेकर यांनी सांगून गणेशोत्सवाच्या काळात या महिला बचत गटांना टाऊन हॉल येथेच स्टॉल उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून या कालावधीत महिला बचत गटांच्या उत्पादित केलेल्या वस्तूंना नागरिकांकडून मोठी मागणी राहील व त्याचा लाभ बचत गटांना होईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी हिरकणी नव उद्योजक महाराष्ट्राची जिल्हास्तरीय विजेत्या १० बचत गटांना प्रत्येकी अडीच लाख रुपयांचा धनादेश वितरण करण्यात आले. त्यांनतर ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री स्टॉलचे उद्घाटन फीत कापून पालकमंत्री निलंगेकर यांनी केले. या महोत्सवास महिला बचत गटांच्या सदस्य मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रकल्प संचालक सुधीर भातलवंडे यांनी केले तर आभार जिल्हा व्यवस्थापक देवकुमार कांबळे यांनी मानले.
Comments