लातूर: वृक्ष लागवड व वृक्ष जोपासना यासाठी ‘लातूर वृक्ष’च्या सदस्यांनी शहरातील सरवत पॅलेस समोरील, प्रकाश नगरमधील एका मोडलेल्या झाडाला प्लास्टर लावून जीवदान दिले.
सरवत पॅलेस समोरील नील गुलमोहरचे झाड अज्ञात व्यक्तीने मध्यभागातून तोडले होते, फक्त एका सालीवर झाडाची फांदी टिकून होती व त्याची पाने हिरवी होती. झाडांना प्लास्टर करुन त्यांना जीवनदान देण्याचा अनुभव असलेले लातूर वृक्ष चे सदस्य सुपर्ण जगताप, पवन लड्डा, इम्रान सय्यद, वैभव डोळे, सोळुके यांनी त्याठीकाणी जाऊन त्या मोडलेल्या फांदीला आतमधल्या बाजुने मध, गूळ, तूप, यांचे मिश्रण लावून वरच्या बाजूस शेण व मातीचा लेप लावून त्यास घट्ट कापड बांधून काठीचा मजबुत आधार देउन प्लास्टर केले. लातूर वृक्षच्या सदस्यांनी यापुर्वी देखील बार्शी रोडवरील, अंबेजोगाई रोड वरील, आयुर्वेद महाविद्यालयातील कित्येक मोडलेल्या झाडांना प्लास्टर चिकित्सा करुन झाडे जगविली आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत झाडांच्या लागवडीच्या संख्येपेक्षा झाडांना तोडण्याचे प्रमाण जास्त आहे अशी खंत वृक्ष तज्ञ सुपर्ण जगताप यांनी व्यक्त केली.
Comments