HOME   लातूर न्यूज

गोसावी समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न सोडवू- अभिमन्यू पवार

अभिमन्यू पवार आमदार आणि मंत्री म्हणून पुढे येतील- व्यंकटेश पुरी


गोसावी समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न सोडवू- अभिमन्यू पवार

लातूर: लातूर शहरातील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचा अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न सोडवला. आता गोसावी समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्नही लवकरच सोडवू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी दिले. औसा विधानसभा मतदारसंघात संपूर्ण समाज पवार यांच्या पाठीशी उभा राहील अशी ग्वाही पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
गोसावी समाज युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण, गुणवंत विद्यार्थी गौरव व विद्यार्थी दत्तक सोहळ्यात उद्घाटक म्हणून पवार बोलत होते. भालचंद्र रक्तपेढीच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा भटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष योगेश बन तर पाहुणे म्हणून ग्रामविकास विभागाचे मंत्रालयातील विशेष कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय गोसावी सभेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा प्रा. डॉ. नीता पुरी, पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत गिरी गोसावी, उपमहापौर देविदास काळे, श्रीमती इंदिराबाई गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती. अभिमन्यू पवार म्हणाले की, लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडला होता. तो सोडवण्याचे आश्वासन आम्ही निवडणुकीत दिले होते. त्यानुसार सत्तेत आल्यानंतर त्यासाठी साडेतीन एकर जागा दिली. संरक्षण भिंत बांधण्यासाठी निधी दिला. गोसावी समाजाच्या स्मशानभूमीसाठीही पालिकेच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून दिली जाईल. स्थानिक पातळीवर हा प्रश्न सुटला नाही तर त्यासाठी मंत्रालय पातळीवरून प्रयत्न केले जातील असे ते म्हणाले.
विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर लातूरकरांसाठी एक मोठी पोकळी निर्माण झाली होती . पण आपल्या कार्यपद्धतीमुळे अभिमन्यू पवार ती पोकळी भरून काढण्याचे काम करीत असल्याचे मत व्यंकटेश पुरी यांनी व्यक्त केले. पवार यांच्या माध्यमातून कामे होत असल्याने आजही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आणि मंत्रालयात लातूरकरांची गर्दी असते. स्व. विलासराव देशमुख असतानाही अशीच गर्दी असायची. ती परंपरा खंडीत झाली नाही. गोसावी समाजाच्या कार्यक्रमास अभिमन्यू पवार आज मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून आले आहेत. पुढील वेळी ते आमदार व मंत्री म्हणून येतील. विधानसभा निवडणुकीत औसा मतदारसंघात पूर्ण गोसावी समाज पवार यांच्या पाठीशी राहील अशी ग्वाही पुरी यांनी दिली.


Comments

Top