लातूर: पावसाळा अर्ध्यापेक्षा अधिक संपला तरीही पुरेसा पाऊस न पडल्यामुळे लातूर जिह्यासह तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पाणीटंचाई, चारा टंचाईची तीव्र समस्या ग्रामीण भागातील जनतेला भेडसावत आहे. नागरिकांना घागरभर पाण्यासाठी व पशुधनाच्या चाऱ्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. लातूर तालुका दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी द्यावी आदी प्रमुख मागण्याचे निवेदन लातूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना देण्यात आले.
लातूर तालुक्यासह जिल्हयात तीन वर्षापासून अत्यल्प पाऊस झाला आहे. यामुळे पाणी टंचाईची व जनावरांना चाऱ्यांची झळ जाणवत आहे. जिल्ह्यातील धरणांमध्येही जेमतेम पाणीसाठा उपलब्ध आहे. लातूर तालुक्यात तर आवर्षणाची अधिक झळ बसल्याने दुष्काळ निवारणासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. शेतकरी सामान्य माणसांची होत असलेली अडचण दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात या प्रमुख मागण्यासह विविध मागण्याचे निवेदन लातूर काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिले. तालुक्यात खरीप हंगामात नापिकी व दुबार पेरणीस मदत म्हणून हेक्टरी ५० हजार रुपये तातडीने अनुदानाची मदत दयावी, शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याबाबत राष्ट्रीयकृत बँका टाळाटाळ करीत आहेत त्यामुळे कर्ज देण्यास टाळणा्ऱ्या बँकावर त्वरीत कार्यवाही करावी, लातूर तालुक्यातील शेतकऱ्यांची सर्व थकीत वीज पंपाची वीजबले माफ करण्यात यावीत, खरीप हंगाम २०१९ चा पिक विमा मंजूर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दयावी, लातूर तालुक्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात यावा, शासन निर्णयातील चारा छावणीच्या जाचक अटी रद्द कराव्यात, दुष्काळी भागात चारा डेपो सुरु करावेत, लोकसंख्येच्या प्रमाणात पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहण वाढविण्यात यावे, तसेच अधिग्रहण केलेल्या मालकाचा मावेजा ताबडतोब देण्यात यावा, लातूर तालुक्यात दुष्काळी परीस्थिती असल्याने सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, रोजगार हमी योजनेतून ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी तातडीने कामे सुरू करावीत, रोजगार हमी योजनेतील कामावरील मजुरांच्या रोजंदारीत वाढ करावी, सामाजिक सहाय्यता (संगायो, इंगायो, श्रावण बाळ) योजना अनुदान वेळेवर देण्यात यावे या मागण्यांचे निवेदन देऊन या संदर्भात तातडीने पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर लातूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजेसाहेब सवाई, राजेसाहेब पाटील, गोविंद बोराडे, दत्तात्रय शिंदे, बादल शेख, पंडीत ढमाले, कैलास पाटील, मनोज पाटील, श्रीनीवास शेळके, गोवर्धन मोरे, नारायण भिसे, अण्णासाहेब पाटील, सहदेव मस्के, डॉ.सतिष कानडे, कमलाकर आनंतवाड, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, वसंत उफाडे, अनिल दरकसे, रामराजा चामे, ज्ञानेश्वर भिसे, शाहरूख बागवान, अकाशा लखापते, प्रताप पाटील, नरेश पवार, युवराज जाधव, रामदास सुर्यवंशी, रामचंद्र सुडे, रघुनाथ शिंदे, अच्युत चव्हाण आदींच्या सह्या आहेत.
Comments