लातूर: लातूर जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता पाहता मराठवाडा वॉटरग्रीडच्या पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्याचा समावेश करावा, अशी मागणी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली होती. त्यानुसार सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यासंदर्भात प्रस्ताव दाखल करावा, त्यास तात्काळ मंजुरी देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असल्याची माहिती पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली. मागच्या वर्षी आणि यावर्षीही लातूरसह मराठवाड्याच्या बहुतांश भागात समाधानकारक पाऊस झाला नाही. मराठवाडा हा कायम दुष्काळाचा छायेत असणारा प्रदेश आहे. त्यातही लातूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांना दुष्काळाची झळ अधिक प्रमाणात बसते. वॉटरग्रीड प्रकल्पात या दोन जिह्यांचा शेवटच्या टप्प्यात समावेश करण्यात आलेला आहे. पण ज्या भागाला सर्वाधिक झळ बसते त्या भागाला या योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायमच मराठवाड्याला दुष्काळी स्थितीतून बाहेर काढण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. पालकमंत्र्यांनी मागणी करताच मुख्यमंत्र्यांनी या विषयाला तात्काळ मंजुरी देण्याची ग्वाही दिली. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव सादर करावा. त्याला तात्काळ मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यामुळे पहिल्याच टप्प्यात लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचा वॉटरग्रीड प्रकल्पात समावेश होणार असून मराठवाड्याची दुष्काळमुक्तीकडे वाटचाल होणार आहे. लातूर जिल्ह्याला या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे असे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले.
Comments