HOME   लातूर न्यूज

लिंगायतांना आरक्षण द्या अन्यथा युती होणार नाही!

खैरेसाहेब, मुख्यमंत्र्यांना इशारा देऊन टाका, आ. अमित देशमुख यांचा सल्ला


लिंगायतांना आरक्षण द्या अन्यथा युती होणार नाही!

लातूर: खैरेसाहेब आपला पक्ष इशारे देण्यात पटाईत आहे. लिंगायत समाजाला सरसकट आरक्षण द्या अन्यथा शिवसेना-भाजप युती होणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांना देऊन टाका असा सल्ला लातुरचे आमदार अमित देशमुख यांनी दिला. इथल्या दिवाणजी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी लिंगायत आरक्षण अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी चंद्रकांत खैरे, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आवाड, आ. विक्रम काळे, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, संतोष सोमवंशी, संयोजक प्रा. सुदर्शन बिराजदार मंचावर उपस्थित होते. राज्यभरातून लिंगायत बांधव या अधिवेशनासाठी जमले होते.
विधानसभेचं पहिलं तिकीट शिवराज पाटील चाकुरक यांनी विलासरावांना दिलं होतं हे विसरू शकणार नाही. त्यांच्यामुळेच साहेब स्वबळावर उभे राहिले. लिंगायत समाजाची आरक्षणाची मागणी रास्तच आहे. या समाजाला सरसकट आरक्षण मिळालं पाहिजे असेही आ. देशमुख म्हणाले.
सरकार आरक्षणच काढून टाकेल, त्यांचा काही नेम नाही!
आरक्षणावर बोलायला हवं असं अलिकडेच सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते. खैरेसाहेब जरा बोलून बघा, तुमची युती आहे. या सरकारचं काहीच खरं नाही नवं जाऊ द्या आहे तेसुद्धा एका रात्रीत काढून टाकतील अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आवाड यांनी केली. लिंगायत समाज मुळातच शोषित आहे. स्वातंत्र्याची खरी ओळख महात्मा बसवेश्वरांनी करुन दिली. तरीही लिंगायतांना मागे कोण ठेवले याचा विचार करा. लिंगायत समाजाने कर्मकांड तेव्हाच नाकारलं होतं. सुधारकांचे खरे गुरू बसवेश्वरच होत. लिंगायत म्हटले की आरक्षण मिळालेच पाहिजे. मी आणि अमित देशमुख दोघेही आरक्षणाच्या बाजूने आहोत. आरक्षण आर्थिक उन्नतीसाठी हवे आहे असे नव्हे तर मुख्य प्रवाहात येण्यासाठी हवे आहे. आठ दिवसात तुम्हाला काहीच मिळणे शक्य नाही. जे खैरसाहेबांना धोका देऊ शकतात, तिथं आपलं काय खरं आहे? आम्हीच तुम्हाला आरक्षण देऊ शकतो असेही आवाड म्हणाले.


Comments

Top